MLA Amol Mitkari in Press Meet. Sarkarnama
विदर्भ

Akola Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उफाळून आला पुन्हा गटबाजीचा वाद!

जयेश विनायकराव गावंडे

NCP News : शिवसेना एकनाथ शिंदे गटाला संदीप पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात नुकताच प्रवेश केला. संदीप पाटील यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आणि पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षच उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे अजित पवार गटातील गटबाजी उफाळून आल्याची चर्चा होऊ लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. एक गट ‘दादांचा’ आणि दुसरा ‘साहेबांचा’ असे दोन गट पडले आहेत. अकोला जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे साहेबांसोबत गेले तर काही जण दादांसोबत राहिले.

राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कृष्णा अंधारे यांची वर्णी लागली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातही दोन गट पडल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे या दोघांमध्ये काही दिवसांपासून बेबनाव पाहायला मिळत आहे. आता ही गटबाजी संदीप पाटील यांच्या स्वागताच्या कार्यक्रमातून पुन्हा उफाळून आल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या संदीप पाटील यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला. संदीप पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आणि पत्रकार परिषद अकोल्यातील विश्राम गृह येथे 19 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे उपस्थितीत नव्हते. त्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे. मिटकरी आणि अंधारे यांच्यातील गटबाजी उफाळून आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाध्यक्ष का उपस्थितीत नाहीत, असे पत्रकारांनी मिटकरी यांना विचारले असता, नवीन लोक जर पक्षात प्रवेश करत असतील तर स्थानिक लोकांचे कर्तव्य आहे त्यांनी यावे. या प्रवेशामुळे ज्यांना आनंद झाला ते आल्याचे आमदार मिटकरी म्हणाले. आम्ही कुणालाही या कार्यक्रमाबाबत सांगितले नव्हते असेही मिटकरी म्हणाले. याबाबत कृष्णा अंधारे यांना विचारले असता संदीप पाटील हे पक्षात केव्हा आले हे आपल्याला माहितीच नाही असे त्यांनी सांगितले. मिटकरी यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचीही जिल्हाध्यक्षांना माहिती नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून अंधारे यांना आमदार मिटकरी हे डावलत असल्याची चर्चा अकोला जिल्ह्यात रंगत आहे. आजच्या कार्यक्रमात दोघांमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांचे कट्टर विरोधक समजले जाणाऱ्या शिवा मोहोड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी चांगलेच संतापले. दिलीप वळसे पाटील त्यावेळी व्यासपीठावर होते होते.

दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच अमोल मिटकरींनी या शिवा मोहोड यांच्या निवडीचा निषेध केला आणि राजीनामा देण्याची धमकीही दिली. शिवा मोहोड यांचे उपजिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीला जिल्हाध्यक्ष अंधारे यांची मान्यता होती. त्यांच्याच माध्यमातून अकोल्यात हा कार्यक्रम झाल्याची चर्चा होती. या कारणावरूनच आता आमदार मिटकरी आणि अंधारे यांच्यातील बेबनाव वाढत गेल्याचे सांगण्यात येत आहे.

बाळापूर विधानसभा मतदार संघासाठी आधीपासूनच इच्छुक असलेले संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे दोघांमधील गटबाजी आणखी उफाळून आली आहे. कारण बाळापूर विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे देखीलज इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या कारणावरून या दोन गटातील वाद आणखी चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT