Akola Congress Metting Sarkarnama
विदर्भ

NCP Leader Congress Metting: काँग्रेसच्या गोपनीय बैठकीला राष्ट्रवादी नेत्याची हजेरी; अकोल्यात खळबळ

Akola Congress : काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत असलेल्या नाराजीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आले होते.

मनोज भीवगडे

Akola News : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. नाराज नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. अशीच एक बैठक महान येथे आयोजित केली असता, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने हजेरी लावल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (NCP leader attends secret meeting of Congress)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून आघाडी आहे. जिल्ह्यात काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून निवडणुका लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अकोला जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत. जिल्ह्यातील कोणता पदाधिकारी कुण्या नेत्याच्या छत्राखाली आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्र पक्षामध्ये जिल्ह्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवरही पडणार आहे.

दोन गटांत विखुरल्या गेलेल्या राष्ट्रवादीतील अनेक नेते हे काठावर आहेत. ते दुसरा घरोबा शोधण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसमधील अंतर्गत बैठकीला महान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत रवी राठी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिवाची उपस्थिती खटकली

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीचे निमंत्रण नाराज नेत्यांसोबत पक्षातील काही मोजक्या नेत्यांनाच देण्यात आले होते. ही बैठक काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत असलेल्या नाराजीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आली होती. असे असताना या बैठकीला मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी हजेरी लावली. त्यांची उपस्थिती अनेकांना खटकल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याला निमंत्रण दिले कुणी?

काँग्रेसची अंतर्गत बैठक असताना त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने हजेरी लावल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला निमंत्रण कुणी दिलं, अशी विचारणाही करण्यात आली. बैठकीचे यजमानपद सुनील धाबेकर यांच्याकडे होते. ते काँग्रेसचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील नेते आहे. त्यामुळे काहींनी थेट धाबेकर यांनाच विचारणा केल्याचे समजते. मात्र, त्यांनीही रवी राठीच्या उपस्थितीबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT