Solapur News : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी १२० जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात १० उपाध्यक्ष, १० चिटणीस, १ कोशाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सोलापूर भाजपमधील बडे प्रस्थ असलेल्या दोन्ही देशमुखांच्या मुलांचीही भाजपच्या सोलापूर शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. (Sons of Subhash Deshmukh &Vijaykumar Deshmukh elected to BJP's Solapur City and Rural Executive)
भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आप्पासाहेब बिराजदार, अपर्णा तारके, महादेव पाटील, सतीश काळे, काशिनाथ कदम, संतोष मोगले, गौरीशंकर बुरकुल, सुभाष मस्के यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा चिटणीसपदी परमेश्वर यादवाड, बादलसिंह ठाकूर, यतिन शहा, सिद्धेश्वर कोकरे, बसवराज शेळके, सतीश पाटील, सिद्धाराम हेले, नितीन करंडे, स्वाती रोकडे, प्रकाश घोडके यांना संधी मिळाली आहे. जिल्हा कोशाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची निवड झाली आहे.
दरम्यान, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र डॉ. किरण देशमुख यांच्याकडे सोलापूर शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण देशमुख यांची निवड ही महत्त्वाची मानली जात आहे. डॉ. देशमुख हे मागील पंचवार्षिकमध्ये सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. आगामी निवडणुकीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.
केवळ विजयकुमार देशमुख यांच्याच नाही, तर आमदार सुभाष देशमुख यांच्या चिरंजीवावरही जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी नवी जबाबदारी सोपवली आहे. मनीष देशमुख यांच्याकडे सोलापूर जिल्हा (ग्रामीण) सरचिटणीसपद देण्यात आले आहे. मनीष यांच्याकडे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी गेल्या वर्षी देण्यात आलेली आहे.
नव्या नियुक्तीमुळे भाजप आमदार देशमुख यांचे पुत्र पक्षीय राजकारणात मुख्य पदावर आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची मानली जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न : सचिन कल्याणशेट्टी
जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व घटकांना आणि जिल्ह्यातील सर्वांना संधी देत सक्षम कार्यकारिणीची घोषणा केली आहे. येत्या काळात भाजप संपूर्ण ताकदीने जनतेपर्यंत पोहोचेल. शतप्रतिशत भाजपसाठी नव्या कार्यकारिणीसह जोमाने कामाला लागणार आहे, असे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नव्या कार्यकारिणीच्या निवडीनंतर सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.