Bacchu Kadu & Sharad Pawar. Sarkarnama
विदर्भ

Amravati : बच्चू कडू-शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय संबंधात 'गोडवा'?

Amar Ghatare

Bacchu Kadu : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील मंत्रिपदाचा दर्जा असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अमरावती जिल्ह्यात भेट होणार आहे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेल्या या दोन पक्षातील नेत्यांची यावेळी कोणती चर्चा होते तसेच शरद पवार - बच्चू कडू यांच्या भेटीतून कोणता राजकीय गोडवा निर्माण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस अमरावती येथे मुक्कामी राहणार आहे. आपल्या दौऱ्यात ते अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. बच्चू कडू यांचे कुरळपूर्णा येथे निवासस्थान आहे. शरद पवार हे कुरळपूर्णा येथे जात बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात फूट पडल्याने शरद पवार आणि बच्चू कडू यांची प्रथमच अमरावती येथे खासगीत भेट होत आहे. पवार हे परतवाड्याला जाण्यापूर्वी आमदार कडू यांच्याशी बोलणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. 2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार देणार आहेत. त्यामुळे पवार-कडू भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आमदार बच्चू कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य हे प्रहारचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आमदार कडू यांनी रवींद्र वैद्य यांच्या नावाला दुजोरा दिला होता. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू नाराज होते. अनेकदा त्यांनी सरकारला फटकारलेही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले त्यावेळी ते जरांगे यांच्या पाठिशी उभे राहिले. सरकारने दगाफटका केल्यास आपण रस्त्यावर उतरणार, असेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याचा तर निर्णय घेणार नाहीत ना, अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पश्चिम विदर्भात शरद पवार गटाची ताकद कमकुवत झाली आहे. शरद पवार गटाकडे आता या प्रदेशात फारसे दिग्गज चेहरे नाहीत. अशात बच्चू कडू शरद पवारांसोबत गेल्यास त्यांना राज्यात व प्रसंगी केंद्रात मोठा राजकीय फायदा मिळवून देण्याची ‘ऑफर’ शरद पवार देऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT