Maratha Reservation : राज्य सरकारनं मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना वेळ मागितली होती. ठरल्यानुसार आता केवळ आठवडाभराचा कालावधी सरकारजवळ शिल्लक आहे. सरकारने जरांगे यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी केलीय.
अमरावती येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार कडू यांनी शनिवारी (ता. 16) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 24 डिसेंबरपर्यंतची वेळ जरांगे यांनी सरकारला दिलीय. या मुदतीत सरकारला मराठा आरक्षण द्यायचे आहे. अशात जरांगे यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणार सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही कडू यांनी दिलाय.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काम करीत आहे. दुसरीकडे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समितीही प्रमाणपत्रांसाठी दिशानिर्देश देत आहे. आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदी आढळल्या आहेत. काही नोंदी पुरातन लिपींमध्ये आहेत. भाषा तज्ज्ञांकडून त्याची खात्री करून घेण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शिंदे समिती आणि सरकार नेमकं काय करीत आहे, हे त्यांनी स्पष्ट करणं नितांत गरजेचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वैगरे घेणे ही भावनिक बाब आपल्या ठिकाणी योग्य आहे. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत किती काम झालय, कसं झालय हे स्पष्ट होणं गरजेचं असल्याचं आमदार बच्चू कडू म्हणाले. सात दिवसात सरकार काय काय करणार आहे, हे देखील मराठा समाजापुढं स्पष्ट झालं पाहिजे. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात मोठी दरी निर्माण करण्याचं काम करण्यात येत आहे. दोन्ही समाजातील नागरीकांनी अशा प्रकाराला बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनं मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणताही दगाफटका केल्यास आपण स्वत: आंदोलनात सहभागी होऊ, असं आपण यापूर्वीच स्पष्टपणे जाहीर केलय. आता सात दिवसात आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झालच तर आपण आंदोलनात सर्वांत पुढं असू, मग आपण सरकारचा कोणताही मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय. त्यामुळं आता सरकारवर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मोठा दबाव निर्माण झालय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.