Pusad, NCP
Pusad, NCP Sarkarnama
विदर्भ

NCP-Sharad Pawar News : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपलेला नाही, नव्याने संघटन मजबूत करणार !

दिनकर गुल्हाने

Yavatmal District's Pusad Policial News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तत्त्वाशी फारकत घेऊन सत्तेसाठी अजित पवार यांच्यासोबत पुसद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेले असले तरी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. पुसद येथे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस संपलेली नाही. असा विश्वास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे लीगल सेलचे प्रमुख ॲड.आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. (The organization of NCP will be strengthened)

पुन्हा एकदा नव्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यात येईल, असेही ॲड. देशमुख यांनी सांगितले. पुसदच्या विश्रामगृहावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज (ता. २९) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रा. शिवाजी राठोड, साहेबराव पाटील, साहेबराव ठेंगे, धर्मेंद्र जळगावकर, सुरेश धनवे, बाळासाहेब पाटील, दादाराव ठाकरे, मोहम्मद फईम, साकीब शाह, शुभम तडसे, नितीन पवार, अशोक बाबर, दीपक जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पुसदचे आमदार कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अजित पवार यांच्या गटात गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातही या निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीचा संदेश दिला आहे. या दृष्टीने पुसदमध्ये चांगले संघटन व्हावे, यासाठी येत्या एक सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष वर्षा निकम यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ॲड. आशिष देशमुख यांनी यावेळी दिली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गावागावांत निरोप पाठविण्यात आले असून नवीन व तरुण प्रामाणिक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने शिबिरात सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. यापूर्वी त्याच त्या लोकांना संधी मिळत होती, आता मात्र नवीन लोकांना वाव मिळणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाच्या आदेशाप्रमाणे यापुढील नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आजच्या पत्र परिषदेला उपस्थित राहून न शकलेले माजी उपनगराध्यक्ष डॉ. अकील मेमन, माधव वैद्य, डॉ. एम. डी. राठोड, ज्ञानेश्वर तडसे, पांडुरंग व्यवहारे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचे भाजपसोबत जाणे, ही शरद पवार यांची खेळी आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे राजकीय गॉसिप असल्याचे सांगितले.

'घड्याळ' साहेबांकडेच..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय घटनेचा मी परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच पक्षाचे चिन्ह 'घड्याळ' शरद पवार साहेबांच्या पक्षाकडेच राहणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे प्रमुख ॲड. आशिष देशमुख एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. तथापि, निवडणूक आयोग प्रभावाखाली काम करीत असल्याने 'सध्या' आपल्याकडे घड्याळ पक्ष चिन्ह राहणार नाही.

फारसे बिघडणारही नाही, असे पवार साहेब म्हणाले आहेत. त्यावर शरद पवार हाच पक्षाचा आश्वासक चेहरा आहे. लोकांच्या मनात तो ठसला आहे, असे देशमुख यांनी पत्रपरिषदेत सांगितले. निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनी तुमचे घड्याळ चिन्ह जाणार, असे खासगीत सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी तर येत्या ३० तारखेला यावर निर्णय होईल, हे आधीच सांगितले आहे. असे असले तरी सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्ह शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच मिळणार, असे मत कायदेविषयक अभ्यासातून त्यांनी नोंदवले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलासुद्धा सुप्रीम कोर्टातून धनुष्यबाण मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रा. शिवाजी राठोड यांनी आमदार इंद्रनील नाईक यांनी घेतलेला निर्णय आपणास पटलेला नाही. पवार साहेबांच्या विचारांशी बांधीलकी आपण जपली आहे. कुठलाही दबाव अथवा प्रलोभन मिळाले तरी आपल्या भूमिकेपासून हटणार नाही, शरद पवारच आमचे नेते आहेत, असे सांगितले.

सुरेश धनवे यांनी भाजपच्या (BJP) तत्वांशी केलेली हात मिळवणी ग्रामीण जनतेच्या पचनी पडलेली नाही, असे सांगून जनता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभी राहील, असे मत व्यक्त केले. यावेळी अशोक बाबर यांनी प्रस्थापित नेतृत्वावर पुसदला विकासापासून कोसो दूर नेल्याची टीका केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT