Vidarbha Politics Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Politics: विदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला; 'या' विधानसभांवर ठोकला दावा

Rajesh Charpe

Nagpur News: एकच आमदार आणि सात जिल्हा परिषद सदस्य असताना लोकसभेत महायुतीच्या विजयाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कॉन्फिडन्स भलताच वाढला आहे. आता त्यांना नागपूर ग्रामीणमध्ये सहापैकी तीन विधानसभा हव्या आहेत. जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी तीन मतदारसंघ द्यावे, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना काटोल आणि हिंगणा असे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते. यापैकी काटोल-नरखेड हा मतदारसंघ अनिल देशमुख यांनी टिकवून ठेवला आहे. हिंगण्यातून माजी मंत्री रमेश बंग दोन वेळा निवडून आले होते. मात्र पंधरा वर्षांपासून हा मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहे. आघाडीच्या काळात अनिल देशमुख यांनी गृहमंत्री, अन्न व नागरी, अबकारी, शिक्षण या खात्यांचे मंत्री होते, असे असतानाही राष्ट्रवादी फारशी जिल्ह्यात फोफावली नाही.

काटोल-नरखेड याच विधानसभा मतदारसंघापर्यंत कायम राहिली. देशमुखांचे आत्मकेंद्री राजकारण याला जबाबदार असल्याचा आरोपही होत असतो. आता राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कार्यकर्ते विखुरले आहेत. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर अजित पवार गटात सहभागी झाल्यानंतर प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय त्यांनी पक्षाची बांधणी सुरू केली आहे. कार्यकारिणी जाहीर करून जबाबदाऱ्यांच्या वाटप केले आहे. जिल्ह्यात काटोल-नरखेड या एकमेव मतदारसंघापुरती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इतर मतदारसंघात स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस सोबत असेल तरच राष्ट्रवादीच्या उमेदवार तग धरू शकतो. अशा परिस्थिती कुंटे पाटील यांनी तीन जागांची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सहापैकी सावनेर आणि उमरेड या दोन मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. काटोल राष्ट्रवादी तर उर्वरित तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. आघाडीला शिवसेनेलाही सामावून घ्यावे लागणार आहे. रामटेक विधानसभा मदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे. हे बघता कुंटे यांच्या दाव्यात काही अर्थ नाही. केवळ स्वतःचे महत्त्व वाढवून घेत आहेत, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT