NCP Sharad Pawar party news : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण मुंबईसह राज्यातील मतदार यादीतील घोळ अन् दुबार मतदारांविषयी विरोधकांना शंकाच आहे. विशेष करून, महाविकास आघाडीमधील सर्वच मित्रपक्ष यावर आता थेट बोलतात. पण राज्य निवडणूक आयोगाकडून यावर स्पष्ट अशी भूमिका मांडता आलेली नाही.
या महापालिका निडवणुका जाहीर झाल्या असतानाच, मुंबई महापालिकासाठी असलेल्या मतदार यादीत असलेल्या 11 लाख दुबार मतदारांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनी अमरावती इथून राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
शशिंकात शिंदे म्हणाले, "राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी जो कार्यक्रम जाहीर केला आहे, आम्ही त्यानुसार निवडणुकांना समोरे जाऊ. पण मुंबई महापालिकेसाठी (BMC Election) असलेल्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार आहे, त्यांची पडताळणी करून ते रद्द केला पाहिजे. त्यावर स्पष्ट अशी भूमिका राज्य निवडणूक आयोग घेत नाही अन् सांगत देखील नाही." मात्र ज्या मतदारांसमोर स्टार केलं आहे, तो मतदार कुठे मतदान करेल, हे निश्चित नाही. याबाबत कसं कंट्रोल करणार हे देखील राज्यनिवडणूक आयोग सांगत नाही, हे दुर्दैव आहे, असा घणाघात शशिकांत शिंदे यांनी केला.
'हा सगळा बोगसपणा चाललेला होता, आम्ही हे निवडणूक आयोगाला (Election Commission) वारंवार सांगितलं. आजही सांगतो की, याच बोगस पद्धतीने निवडणुका चाललेल्या आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिली आहे, ज्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो, त्यांनी त्याकडे गांभीर्याने बघितलं नाही, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून या निवडणुका, निवडणूक आयोग घेत आहे,' असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले.
'मुंबई महापालिकेसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मनसेला महाविकास आघाडीत कसं समावून घ्यायचं, यावर मुंबईत चर्चा सुरू आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या हातात राहण्यासाठी आम्ही सर्व तडजोडी करण्याचा प्रयत्न करू. मत विभाजन नको, यासंदर्भात काळजी घेणार आहोत. सर्वांना बरोबर घेणार आहोत,' असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
'मनसे'बाबत महाविकास आघाडीमधील काँग्रेस उत्सुक नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेबाबत उत्सुकता दाखवलेली नाही. 'मनसे'च्या विचारसरणीवर काँग्रेसचा विश्वास नाही. यावर शशिकांत शिंदे म्हणाले, "मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी आम्ही काँग्रेसला समजून सांगण्याचा प्रयत्न करू. मुंबई आपल्या हातातून गेली नाही पाहिजे, यासाठी आपण एकत्र लढले पाहिजे."
'ज्या पद्धतीने लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून होतो आहे, त्यामुळे लोकांनी आता ही निवडणूक हातात घ्यावी, असे आवाहन करताना, सत्तेमध्ये मस्तीत असलेल्या सरकारला, निवडणूक आयोगाला, लोकं निवडणूक कशी हातात घेतात, हे दाखवून दिले पाहिजे,' असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील, "नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा घोळ झालेला आहे. 50 वर्षात अशा निवडणुका झाल्या नाहीत, अशा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या. अनेकांना धाकधूक आहे की, ईव्हीएम बॉक्समध्ये काय होईल? महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व मित्र पक्षासोबत चर्चा करत आहोत. जिल्हास्तरावर आम्ही जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले आहेत." महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे मनसेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असेही देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.