Nagpur Political News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या दोन सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. तीन महिन्यांसाठी निवडणूक घेतली जात असल्याने यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.
निवडून येणाऱ्या सदस्यांना तीनच महिन्यांचा सक्रिय कालावधी मिळणार आहे. त्यामुळे, या निवडणुका घेणे हे जनतेच्या पैशाची नासाडी असून त्या घेऊ नयेत, अशी विनंती या तीनही सदस्यांमार्फत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या टेकाडी सर्कलमध्ये निवडून जाहीर करण्यात आली आहे.
रश्मी बर्वे या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार होत्या. या दरम्यान त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नाही. या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयास अंतरिम स्थगिती दिली आहे.
या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. पंचायत समिती सदस्यपदासाठी पारडसिंगा येथे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सलील देशमुख, तसेच शेकापतर्फे आव्हान देण्यात आले आहे. पारडसिंगाखेरीज जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा येथेही पंचायत समिती सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होत आहे.
देशमुख यांच्या याचिकेनुसार, संबंधित सदस्य ऑगस्टमध्ये निवडून येईल. त्यांचा कार्यकाळ १० जानेवारी २०२५ रोजी संपणे अपेक्षित आहे. तसेच, दरम्यानच्या काळात विधानसभेची निवडणूक आहे. त्यात सुमारे दीड महिन्यांसाठी आचारसंहिता लागलेली असेल. परिणामी निवडून येणाऱ्या सदस्याला केवळ तीन ते साडेतीन महिन्यांचाच सक्रिय कालावधी मिळेल. त्यानंतर नियमित निवडणूक होणारच आहे.
या राजकीय स्थितीमुळे ही पोटनिवडणूक म्हणजे जनतेच्या पैशाची नासाडी आहे, असा युक्तिवाद याचिकेतून करण्यात आला आहे. रश्मी बर्वे यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या सर्कलमध्ये मतदान घेऊ नये, अशी विनंती करणारी याचिका बर्वेंनी यापूर्वी दाखल केली आहे. पुढील सुनावणी 24 जुलै रोजी निश्चित केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.