Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्य ढवळून काढण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक विभागातून महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढून मुंबईतील वरळी ग्राऊंडवर एक ते चार मे या दरम्यान एकत्रित असा महोत्सव साजरा केला जाणार आहे. यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणार आहे.
मराठी भाषा आणि मराठी माणसावर आपला हक्क सांगणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे हा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे. या महोत्सवात कोकणापासून तर विदर्भातील संस्कार, संस्कृती, नृत्य, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. त्यासोबतच हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला जाणार आहे.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील गैरव रथयात्रेची जबाबदारी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश प्रवक्ते तसेच नागपूर शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्याकडे देण्यात आली आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यातील गौरव यात्रा नागपूरमध्ये येणार आहेत. व्हेरायटी चौकात एक सामूहिक कार्यक्रम केल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून ही यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे. या रथयात्रेत प्रत्येक जिल्ह्यतील पवित्र जल आणि माती गोळा करून मंगल कलश मुंबईला नेला जाणार आहे.
नागपूरच्या गौरव यात्रेला दीक्षाभूपासून सुरुवात होईल. दीक्षाभूमी, ताजाबाग, टेकडी गणेश मंदिराची माती गोळा केली जाईल. नागपूर ग्रामीणची रामटेकच्या गडमंदिरातून प्रारंभ होईल प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेली माती, अंबाळा तलाव, अंभोरा येथील वैनगंगेचे जल घेऊन व्हेरायटी चौकात येईल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातील पवित्र जल व माती घेऊन 29 एप्रिलला यात्रा मुंबईकडे रवाना होईल.
मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त वरळी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील दिवंगत मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्ने, बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी दिली.
यावेळी ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर, कार्यध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर, तानाजी वनवे, जानबा मस्के, रमण ठवकर, सुखदेव वंजारी, महिलाध्यक्ष सुनीता येरणे, विशाल खांडेकर, मिलिंद महादेवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.