MP Praful Patel & Sunil Mendhe. Google
विदर्भ

Gondia : विद्यमान खासदारांशी चर्चा केल्यानंतर प्रफुल्ल पटेल ठरविणार लोकसभेची वाटचाल

अभिजीत घोरमारे

Bhandara & Gondia Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट राज्यातील सत्तेत सहभागी झालाय. कोणत्याही मुद्द्यावर भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि दादांच्या गटातील नेते एकमेकांत मतभेद होतील असं वक्तव्य केले जाणार नाही, याची काळजी घेत आहेत. तीनही पक्षांकडून ही काळजी घेण्यात येत आहे. याचाच प्रत्यय शुक्रवारी (ता. 1) गोंदिया येथील बिरसी विमानतळावर आला.

लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा मतदारसंघाबाबतचा निर्णय चर्चेतून घेणार असल्याचं नमूद केले. (NCP Working President MP Praful Patel Stated He Will Take Decision About Lok Sabha Election 2024 After Discussion With MP Sunil Mendhe About Bhandara & Gondia Constituency)

गोंदियातील बिरसी विमानतळावरून शुक्रवारी पुन्हा एकदा प्रवासी विमान वाहतुकीला प्रारंभ झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमासाठी भाजप खासदार सुनील मेंढे व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल दोन्ही नेते उपस्थित होते. बिरसी विमानतळावरून विमान हवेत झेपावल्यानंतर बोलताना खासदार सुनील मेंढे यांनी या सेवेतून भंडारा-गोंदियासह बालाघाटमधील प्रवाशांना सुविधा मिळणार असल्याचं नमूद केलं. प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय नेते असा उल्लेख करीत खासदार मेंढे यांनी पटेल यांनी विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्याठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती केली. लवकरच संपूर्ण देशासाठी गोंदियातून विमानसेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट डोळ्यापुढं असल्याचं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेची 2024 मध्ये होऊ घातलेली निवडणूक भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लढविणार का, याबाबत बोलताना खासदार पटेल म्हणाले की, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व खासदार सुनील मेंढे चांगल्या प्रकारे करीत आहेत. निवडणुकीपूर्वी खासदार मेंढे यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यानंतरही निवडणुकीबाबत अधिक भाष्य करता येईल, असं पटेल म्हणाले. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण विषयावरून नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यामुळे छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बोलताना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीवर कोणीही चुकीचे विधान करणे अयोग्य ठरेल. कुणीही अशी विधानं करू नये, अशी विनंती खासदार पटेल यांनी केली.

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून तब्बल वर्षभरानंतर पुन्हा प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाला आहे. गोंदिया- हैदराबाद- तिरुपतीपर्यंत ही सेवा सुरू झालीय. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानाला सिग्नल दिला. या वेळी खासदार सुनील मेंढे यांच्यासह इंडिगो विमान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT