Washim News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाशिम जिल्ह्यात आज (ता. २७ ऑगस्ट) जोरदार धक्का बसला आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून मानोरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे आणि नऊ नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम करत माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. (NCP's Manora mayor and nine councilors join Bachu Kadu's Prahar party)
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मनोरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ठाकरे आणि त्यांचे नऊ नगरसेवक, तसेच भाजपच्याही एका नगरसेवकाने आज प्रहारमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वाशिमचे जिल्हाध्यक्षपद हे युसूफ पुंजानी यांना दिले होते. त्यामुळे नाराज होऊन नगराध्यक्ष ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे मानले जात आहे. ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मात्र, राष्ट्रवादीला मनोरा नगरपंचायतीत सत्तेवरून आता विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे.
मनोरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील नगराध्यक्ष ठाकरे आणि नऊ नगरसेवकांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांच्यासोबत भाजपचे आमदार राजेंद्र पटणी यांच्या जवळचे नगरसेवक अभिषेक चव्हाण यांनीही पक्षातून बाहेर पडत बच्चू कडू यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे भाजप आता मनोरा नगरपंचायतीत शून्यावर आला आहे.
मानोरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मते देत नगराध्यक्ष आणि १४ नगरसेवक निवडून दिले होते. पण, पक्षाला ती सत्ता राखता आली नाही. विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नाही, त्यामुळे गावचा विकास थांबला आहे. गावच्या विकासासाठी आम्ही बच्चू कडू यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे ते बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या चिन्हावर विधानसभेची आगामी निवडणूक लढवतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.