Praniti Shinde News Sarkarnama
विदर्भ

Praniti Shinde :... म्हणून प्रणिती शिंदेंचा तो मुद्दाच रेकॉर्डवरून हटवला

Anand Surwase

Nagpur News : सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या मंगळवारी हिवाळी अधिवेशनात आपला मुद्दा मांडत असताना, आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या मुद्यावर हरकत घेतल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे राणे यांच्या हरकतीनंतर विधानसभा अध्यक्षांनी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलेला मुद्दाच रेकॉर्डवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. यावरून काही काळ सभागृहात गदारोळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विधानसभेच्या कामकाजात मंगळवारी औचित्याचे मुद्दे मांडले जात होते. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिकेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. यामध्ये शिंदे यांनी सोलापूर महापालिकेतील 1995 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या एकूण 295 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात 25 जानेवारी 2022 मध्ये बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये तत्कालीन नगरविकास मंत्र्यांकडून सकारात्मक निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नगरविकास विभागाने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार शिंदे यांचा औचित्याचा मुद्दा थोडक्यात आटोपला. त्यामुळे त्यांनी सभागृहातील प्रमुख मंत्र्यांची उपस्थित लक्षात घेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर आणखी एक मुद्दा उपस्थित केला. मुंबईतील भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी अश्वजीत गायकवाड याने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घातल्याच्या प्रकरणावर प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

प्रणिती शिंदे म्हणाल्या ,अश्वजीत गायकवाड हा MSRDC चे एमडी यांचा पुत्र असून तो भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने एका तरुणीच्या अंगावर गाडी घालून तिला फरफटत नेले, तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच तिचा एसआयटी मार्फत जबाब नोंदवण्यात आला नाही. अश्वजीत गायकवाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न म्हणून कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंद न झाल्यानेच त्याला जामीन मंजूर झाला असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.

आमदार प्रणिती शिंदे या एका पीडित तरुणींचा मुद्दा मांडत असताना आमदार नितेश राणे यांनी मात्र त्यांच्या या मुद्द्याला खोडा घातला. राणे म्हणाले,"आमदार प्रणिती शिंदे या सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडत आहेत. असे असताना त्यांनी मध्येच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा मांडणे योग्य नाही. त्यांचा हा मुद्दा नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप घेतला'. तसेच त्यांचा फक्त औचित्याचा मुद्दा रेकॉर्डवर घेऊन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी केली. यावेळी आमदार राम सातपुते यांनी देखील आमदार राणेंना साथ दिली.

आमदार नितेश राणे यांनी सभागृहाच्या कामकाजांच्या नियमांवर बोट ठेवत प्रणिती शिंदे यांना विरोध केला. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्षांनी प्रणिती शिंदे यांचा औचित्याचा मुद्दाच रेकॉर्डवर घेतला जाईल. त्यांचा दुसरा मुद्दा रेकॉर्डवरून हटवला जाईल असे स्पष्ट केले. आमदार राणे यांनी अश्वजीत गायकवाडच्या मुद्दा मांडण्यास केलेल्या विरोधामुळे प्रणिती शिंदे या संतापलेल्या दिसून आल्या.

(Edited By -Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT