महेश माळवे -
Shrirampur News: श्रीरामपूर येथील शहर पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी महानिरीक्षक येण्याचा निरोप धडकला आणि अंग झटकून सगळी यंत्रणा कामाला लागली. बाह्यरूपाच्या रंगरंगोटीला प्राधान्य देत एकाचवेळी तीन गुन्ह्यातील टोळ्या पकडून दौऱ्याआधीच वरिष्ठांकडून शाब्बासकीची थापही मिळविली. लाखो रुपयांची उधळपट्टी करत साहेबांसाठी कारपेट अंथरले आणि ठाण्याला कार्पोरेट साज चढला.
पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर हे शहर पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी येणार होते. त्यांचा दौरा सोमवारी (ता.19) निश्चित झाला आणि वर्षभराहून अधिककाळापासून नियुक्तीला असलेले शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अंगझटकत आपल्यातील टापटिपणाला मोकळीक करून दिली. गेल्या 8 ते 15 दिवसांपासून शहर पोलीस ठाण्यात सुरू असलेली धांदल उडाली. ठाण्याच्या आवारातील वाहने व्यवस्थित ठेवल्यानंतर पूर्वी पेव्हर ब्लॉक लावून उरलेल्या जागीही जुन्या पोलिस वसाहतीतील ब्लॉक पालिकेच्या मदतीने उर्वरित जागेत बसविण्यात आले. आतापर्यंत ठाण्याला गेट नव्हते तेही लावण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इमारतीला रंगरंगोटीसह सुशोभिकरण करण्यात आले. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकावर अवाक होण्याची वेळ आली इतका बाह्यरूपात बदल करण्यात आला. हे होत असताना मंगळसूत्र, पाणबुडी व दुचाकी चोरणाऱ्या टोळ्या वेगवेगळ्या दिवशी पकडण्यात आल्या. मात्र, त्याचे जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या उपस्थितीत उत्तम प्रेझेंटेशन करण्यात आले.
एकीकडे कौतुकाची थाप व अॅवार्ड पदरात पडत असताना ओला यांच्याकडे तक्रार घेऊन येणाऱ्यांची रिघ सुरू होती. यातील काही बाबी खटकल्याने ओला यांनी गवळी यांना तक्रारदारांची फिर्याद नोंदवून घ्या, त्यावर तुम्हाला काय अहवाल करायचा तो नंतर करा, अशी सूचना करत कानही उपटले.
यानंतर दोनच दिवसांनी पोलिस महानिरीक्षक शेखर यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी अंगणापासून अधिकाऱ्याच्या केबिनपर्यंत कारपेट अंथरण्यात आले. प्लॅस्टिकच्या फुलांनी भिंती व आवार सजविण्यात आले. फुलझाडांच्या कुंड्या लावल्या गेल्या. नवीन शोभेची झाडेही लावण्यात आली.
पोलिस ठाण्याला एखाद्या कार्पोरेट कार्यालयाचे स्वरूप आले. या सजावटीवर लाखो रूपयांची झालेली उधळण ती कोणाच्या खिशातून गेली हा संशोधनाचा विषय ठरावा. या खर्चाविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी खरा कस लागला तो साहेबांची बडदास्त ठेवण्यासाठी. याबाबत सर्वांनी कानावर हात ठेवले तरी साहेबांनी राबविलेला सीसीटिव्हीचा उपक्रम हायलाईट करण्यात सर्वांनी धन्यात मानली. उपाधिक्षक कार्य़ालयात बैठकीनंतर शेखर यांनी बेलापूर पोस्टला भेट देत दौऱ्याची सांगता केली.
पोलिस ठाण्याचे बाह्य व अंतर्गत बदल झाला, तो चांगलाही आहे. परंतु, शहरात राजकीय पक्षांच्या आश्रयाने सुरू असलेल्या जागा, रस्ते गिळंकृत केली जात आहेत. मटका, जुगार खुलेआम सुरू आहे. अवैध वाळू विक्री सुरू आहे. यातून फोफावणाऱ्या गुन्हेगारी जगताची पालेमुळे घट्ट होत असून नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न चव्हाट्यावर आल्याने यावर कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत अधिकारी दाखविणार आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.