Nitin Gadkari Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari : शरद पवारांनी कृषिमंत्री असताना केलेल्या कामांचे नितीन गडकरींकडून कौतुक, म्हणाले...

Sharad Pawar News : पवारांनी राजकारणासोबतच समाजकारणाला महत्व दिल्याचेही गडकरी म्हणाले.

Amar Ghatare

Amravati News : शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? यावरून महाराष्ट्रात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींनीही कृषी क्षेत्रातील कामांवरून पवारांवर निशाणा साधला होता. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांची एका कार्यक्रमात तोंडभरून स्तुती केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

''पवार यांनी कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात जे भरीव काम केले, त्याला तोड नाही. पवारांच्या पुढाकारातून पश्चिम महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडली. त्यातून विदर्भातील कृषी क्षेत्राने धडा घेत दुग्ध व कृषीपूरक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा.'', असे आवाहन गडकरी यांनी केले.

तसेच पंजाबरावांचे नाव मोठे आहे आणि शरद पवारांचेही(Sharad Pawar) नाव मोठे आहे. त्यामुळे पंजाबरावांच्या नावाने पवारांना मिळालेला पुरस्कार आनंदायी आहे असे गडकरी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती येथे बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा यावेळी गडकरींच्या(Nitin Gadkari) हस्ते पाच लक्ष रुपये, शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार अनिल देशमुख, आमदार सुलभा खोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, नागपुरातील माजी आमदार प्रकाश गजभिये आदी यावेळी उपस्थित होते.

गडकरी यांनी शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळातील स्मृतींना उजाळा दिला. त्यावेळी आपण राज्याच्या विधिमंडळात आमदार होतो, असे त्यांनी सांगितले. पवारांनी राजकारणासोबतच समाजकारणाला महत्व दिल्याचेही ते म्हणाले. पंजाबरावांच्या नावाने पुरस्कार द्यायचा होता. त्यामुळे त्या उंचीचा व्यक्ती शोधण्याची जबाबदारी निवड समितीवर होती. यंदाची जबाबदारी यशस्वी झाली आहे, आता पुढच्या वर्षी अशाच उंचीचा व्यक्ती शोधावा लागले, असेही गडकरी म्हणाले.

अमरावतीच्या विमानतळाचा मुद्दाही गडकरींनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केला. शरद पवार यांचे भाषण ऐकायचे होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी थांबायला नक्कीच आवडले असते. परंतु अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे ‘लाइट’ अद्यापही लागलेले नाहीत. विमानाच्या पायलटला अंधार पडल्यावर दिसत नाही. अशात आपल्याला पाच वाजेपूर्वीच जावे लागत असल्याचे नमूद करीत गडकरींनी विमानतळाच्या विषयाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

डॉ. पंजाबराव देशमुख(Punjabrao Deshmukh) यांचा 125व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यावर आधारित 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे यावेळी विमोचन करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, राजकारणी लोकांची दृष्टी फारतर पाच वर्ष, दहा वर्षांपुरती मर्यादित असते. ती निवडणुकीपुरती असते. परंतु दृष्टा व्यक्ती 100 वर्ष पुढचा विचार करतो. त्यादृष्टीने नियोजन करतो.

भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख हे राजकारणी नव्हते. त्यांनी स्वत:च्या राजकीय हितासाठी कधीही काम केले नाही. उलट पुढील 100 वर्षांचा विचार करीत त्यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अमूल्य योगदान दिले, असे गौरवोद्गारही गडकरी यांनी काढले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT