Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारसभांचा सध्या धडका राज्यात सुरू आहे. स्टार प्रचारक म्हणून त्यांनाच सर्वाधिक मागणी आहे. भाजपच्या प्रचारसभांमधून ते सध्या तुफान टोलेबाजी करीत आहेत. त्यामुळे विरोधकांची चांगलीच अडचण होऊ लागली आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघाच्या सभेत त्यांनी मुलाने टीव्ही फोडण्याची धमकी दिल्याने बापाने त्याला उमेदवारी दिल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. सध्या या बाप व मुलाचीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे. काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपने (BJP) चरणसिंग ठाकूर तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख यांच्यामध्येच येथे उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू होती. शेवटी अनिल देशमुखांना माघार घ्यावी लागली. हाच धागा पकडून गडकरी यांनी देशमुखांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले माय, बापाने नव्हे तर जनतेने म्हटले पाहिजे मुलाला तिकट द्या. मुलाने घरचा टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून कोणी तिकीट देतो का ? असा सवाल करताच सभेत एकच हशा पिकला.
आमच्या पक्षात हे चालत नाही. खासदाराच्या पोटातून खासदार आणि आमदाराच्या पोटातून आमदार हे चालणार नाही. काँग्रेसमध्ये मुलाबाळांना तिकीट देऊन घराणे चालवले जातात, अशीही टीका त्यांनी केली. काटोलमध्ये दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व असे पोस्टर पाहिले. यांनी काय दमदार काम केले मला माहिती नाही, तुम्ही सांगा असे म्हणत त्यांनी अनिल देशमुख यांनाही अंगावर घेतले. जे नेते आपल्या कामावर निवडून येत नाहीत, ते जातीच्या ढाली वापरतात. जे काम करतात त्यांना जातीची गोष्ट करण्याची गरज नाही.
सध्या राज्यात अनेक नेत्यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. मला याबाबत एकाने विचार तेव्ही मी त्याला थांब टकल्या भांग पाडतो हा सिनेमा बघितला का ? अशी विचारणा केली. त्या सिनेमांत केस नसलेला व्यक्ती डोक्यावर कंगवा फिरवत होता. सध्या अनेक टक्कलवाले कंगवा फिरवून राहिले आहेत, अशी खिल्ली त्यांनी भावी मुख्यमंत्र्यांची चर्चा असलेल्या नेत्यांची उडवली. राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ठरवते. यासाठी विधानसभा निवडणुकीत निवडून यावे लागते, पक्षाकडे बहूमत असावे लागते, असे सांगून मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्यांचाही गडकरी यांनी समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.