Ninad Dixit, son of former Nitin Gadkari aide Jayant Dixit, files nomination as Forward Bloc candidate from Nagpur ward near RSS headquarters amid BJP ticket unrest. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election : नितीन गडकरींच्या पीएच्या मुलाने भाजपला मोजलचं नाही; थेट RSS मुख्यालय परिसरातून विस्मरणात गेलेल्या पक्षाचा उमेदवार

Nagpur Municipal Election : गडकरींच्या माजी पीएच्या मुलाने भाजपकडे तिकीट न मागता नागपूर महापालिका निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉककडून उमेदवारी दाखल करून भाजपमधील असंतोष अधोरेखित केला.

Rajesh Charpe

Nagpur News : भाजपात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक दिग्गजांना घरी बसवण्यात आले आहे. यातच महापालिकेची तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. नव्या आणि जुन्यांचा वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेल्यांनी आम्ही सतरंज्यांच्याच उचलायच्या का असा सवाल करून बंडाचा झेंडा फडकावला आहे.

ही परिस्थिती उद्‍भवणार आहे याची आधीच कल्पना असल्याने घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी पीआरओ जयंत दीक्षित यांच्या मुलाने भाजपकडे उमेदवारीसाठी अर्जच केला नाही. त्यांनी एकेकाळी डाव्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या आणि नवीन पिढीला ज्ञात नसलेल्या फॉरवर्ड ब्लॉकचा झेंडा खांद्यावर घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

निनाद दीक्षित असे या २५ वर्षाच्या युवकाचे नाव आहे. संघ मुख्यालयाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 25 मधून त्याने आपली दावेदारी दाखल केली आहे. तीन पिढ्या स्वयंसेवक असलेल्या एका युवा स्वयंसेवकाने हे धाडस केले आहे. या प्रभागात भाजपचा बोलबाला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागातील एका जागेसाठी मागल्यावेळी दोन कट्टर स्वयंसेवकांमध्ये मोठा राडा झाला होता.

गडकरी यांच्या वाड्यापर्यंत हे भांडण गेले होते. त्यामुळे दोन्ही स्वयंसेवकांना तिकीट नाकारण्यात आले होते. यावेळी पुन्हा भाजपने तीच चूक केली. श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य या दोघांनाही या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली. दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला आहे. या पैकी एकाला माघार घ्यावी लागणार असल्याने पुन्हा वाद उद्‍भवणार आहे. हे बघून निनाद यांनी भाजपकडे उमेदवारी मागण्याच्या भानगडीतच पडले नाहीत.

तीन पिढ्यांपासून आम्ही संघात (RSS) आहोत. कायम स्वयंसेवक राहणार आहोत. महापालिकेची निवडणूक ही राष्ट्रीय विचारांची लढाई नाही. लोकांच्या समस्यांची आहे. भाजपच्या नगरसेवकांनी लोकांच्या इच्छा, अपेक्षा आणि समस्या दूर केल्या असत्या तर निवडणूक लढण्याची गरज भासली नसती. त्यामुळे संघ सोडला आणि बंड केल्याचा बाऊ करण्याची गरज नाही.

आमच्या निष्ठा संघाशी कायमच राहणार असल्याचे निनाद यांचे म्हणणे आहे. राहिला प्रश्न फॉरवर्ड ब्लॉकची निवडीचा. फॉरवर्ड ब्लॉक एकेकाळी डाव्या विचारांचा पक्ष होता. विदर्भवीर दिवंगत. जाबुवंतराव धोटे हे या पक्षाचे अध्यक्ष होते. आता फॉरवर्ड ब्लॉकने विचारसरणी बदलली आहे. डाव्या विचारांच्या लोकांना पक्षापासून दूर केले आहे. सुभाषचंद्र बोस आणि विवेकानंदांच्या विचारावर या पक्षाने आपली वाटचाल सुरू केल्याचा दावा निनाद दीक्षित यांचा आहे.

भाजप आता नेत्यांचा पक्ष झाला आहे. कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. नेता म्हणेल त्यालाच भाजपचे तिकीट दिल्या जाते. सध्या राज्यभर तिकिटी वाटपावरून जो असंतोष उफाळून आला आहे, कार्यकर्त्यांना डावलल्याचे जे चित्र दिसत आहे त्यावरून हे स्पष्ट होते. हे बघूनच निनाद याने वेगळी वाट निवडली. निवडणुकीतील यश अपयशाचा विचार केला नसल्याचे निनाद यांचे वडील जयंत दीक्षित यांनी सांगितले.

निनाद दीक्षित म्हणाले, मी भाजपचा प्राथमिक सदस्य नाही. त्यामुळे भाजपकडे तिकीट मागण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. स्वयंसेवक असलो तरी संघ कोणाला लढ किंवा बस म्हणायला सांगत नाही. या उलट स्वयंसेवक असल्याने संघाच्या अनेक प्रचारकांनी मला शुभेच्छा दिल्या. प्रभाग क्रमांक 22 मधून लढण्यासाठी आधीपासूनच तयारी केली होती. याकरिता एक नागरी समिती स्थापन केली होती. आम्हाला चार सदस्यांचे पॅनेल लढवायचे होते. ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मी एकटाच लढत आहे.

फॉरवर्ड ब्लॉक पक्षात प्रवेशसुद्धा केला नाही. अपक्ष लढल्यास चिन्ह भेटायला वेळ लागतो. त्यामुळे फॉरवर्ड बॉल्कचे ‘सिंह' हे चिन्ह घेतले. एवढाच त्या पक्षासोबत संबंध आहे. मागील निवडणुकीत भाजपला (BJP) या प्रभागातून 37 टक्के तर काँग्रेसला 12 टक्के मते मिळाली होती. यावरून 51 लोकांना दोन्ही पक्ष नको आहे हे स्पष्ट होते. यावेळी या प्रभागातून भाजपच्या 27 लोकांनी तिकीट मागितले होते. कोणालाही दिली तरी 26 इच्छुक नाराज होणार आहेत. आमचा सर्व फोकस 51 टक्के मतदारांवर असल्याचे निनाद दीक्षित यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT