Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu on Cabinet Expansion : आता मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही तर...; बच्चू कडू स्पष्टच बोलले

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गुरुवारी (ता. ११) दिला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी देण्याचा प्रयत्न केले असते. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे स्पष्ट झाले आहे.

न्यायालयाने सत्तासंघर्षातील घडामोडींवर काही ताशेरे ओढले असले तरी शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिले आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रीपदी आपली वर्णी लागावी, यासाठी भाजप-शिवसेनेसह अपक्ष आमदारांनीही 'फिल्डिंग' लावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निकालानंतर शुक्रवारी (ता. १२) आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळण्याबाबत मोठे विधान केले आहे. ते अमरावती येथे बोलत होते. (Maharashtra Cabinet Expansion)

आमदार कडू यांनी सत्तेतील शिवसेनेकडे संख्याबळ असल्याचे निकालातून स्पष्ट झाल्याचे सांगितले आहे. कडू म्हणाले, "सत्तासंघर्षाचा निकाल हा बहुमताच्या बाजूने लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार, खासदारांसह शाखांचे प्रमुखांचे मोठे बळ आहे. त्यांनी कागदपत्रांचे योग्य नियोजन केले होते. दरम्यान, ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून काही चुका झाल्या. न्यायालयाने काही ठिकाणी ताशेरे ओढले हे मान्य आहे. मात्र शेवटी मुख्य निकाल कुणाच्या बाजूने दिला याला महत्व आहे. देशातील पहिली घटना आहे की त्यात न्यायालयाने योग्य निकाल दिला."

दरम्यान, राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनासुद्धा मंत्री होण्याची आशा आहे. त्यावर कडू म्हणाले, "आता लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास काही अडचण नसावी. येत्या २०-२१ मे पर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होण्याची माहिती आहे. मंत्रीमंडळ विस्तार आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी महत्वाचे आहे. एका मंत्र्याला अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सांभाळावे लागत आहे. त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न सुटण्यास मर्यादा येतात. मंत्रीपद कुणाला मिळेल हा नंतरचा भाग आहे, पण मंत्रीमंडळ विस्तार करणे फार महत्वाचे आहे. मंत्रीमंडळ विस्तार आता झाला नाही तर २०२४ नंतरच होईल, असे मला वाटते."

बच्चू कडू यांच्या पुढाकारातून दिव्यांग मंत्रालय झाले आहे. आता मंत्रीमंडळाचा विस्तारात मला आशा असल्याची भावनाही कडू यांनी व्यक्त केली. यावर ते म्हणाले, "निकालानंतर अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काही बोललो नाही. मात्र यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला मंत्रीपदासाठी शब्द दिलेला आहे. तो ते पूर्ण करतील."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT