OBC Reservation News  Sarkarnama
विदर्भ

OBC Reservation News : ओबीसी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ठाकरे गटातील नेत्यांबाबत नाराजी...

Atul Mehere

Nagpur : आरक्षणासह १५ न्याय मागण्यांसाठी उपराजधानी नागपुरात सध्या ओबीसी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. चंद्रपुरातही अन्नत्याग आंदोलन पेटले आहे. ओबीसी समाजापुढे नमते घेत सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलाविले आहे, अशात उद्धव ठाकरे गटातील दोन नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याची नाराजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.

‘हे कोणत्याही पक्षाचे आंदोलन नाही. हे समाजाचे आंदोलन आहे. आंदोलनस्थळी सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, संघटनांचे प्रतिनिधी येऊन गेले. जे आले व जे येतील त्यांचे स्वागतच आहे. कुणी नाहीच आले, तर त्याबद्दल काय बोलायचे,’ असे डॉ. तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्याआग्रहाच्या निमंत्रणामुळे युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे नागपूरमार्गे पांढुर्णा येथे दौऱ्यावर आले. नागपुरात येऊनही आदित्य ठाकरे संविधान चौकात सुरू असलेल्या ओबीसींच्या आंदोलनस्थळी फिरकलेही नाही. नागपूर किंवा चंद्रपुरातील आंदोलनकर्त्यांशी त्यांनी फोनवरसुद्धा संवाद साधला नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही हाच कित्ता गिरविला.

अतिवृष्टीमुळे नागपुरात आलेल्या पुरानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अंबादास दानवे नागपुरात आले होते. दानवेही आदित्य ठाकरेप्रमाणे आंदोलनाकडे आले नाहीत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या दानवे यांनीही संविधान चौकात जात ओबीसी नेत्यांशी संवाद साधणे टाळले.

मराठा आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे हे स्वत: आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आघाडीवर होते. मात्र, आदित्य व पक्षातील मुख्य नेत्यांपैकी एक असलेल्या दानवे यांना आंदोलन स्थळाच्या अगदी जवळ येऊनही ओबीसींचा विसर का पडला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. ओबीसींना भेटायला जाणार आहात का, या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे आदित्य यांनी नागपूर दौऱ्यात टाळले होते. नागपुरातील ओबीसी आंदोलनातील नेत्यांचे याबाबत सध्या मौन असले, तरी याबाबतही नाराजी अनेकांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT