Waiting Queue For Petrol. Sarkarnama
विदर्भ

Hit & Run : विदर्भातील 322 पेट्रोल पंपांवर मोठे इंधन संकट...

प्रसन्न जकाते

Nagpur : ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणांसाठी केंद्र सरकारने 10 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद असलेला नवीन कायदा लागू केला आहे. सरकारच्या या कायद्याविरुद्ध देशभरातील वाहन चालकांनी बंद पुकारला आहे. या बंदचा मोठा फटका विदर्भातील पेट्रोल पम्पांना व जीवनावश्यक साहित्याच्या पुरवठ्याला मंगळवारी (ता. 2) दुपारनंतर बसण्याची शक्यता आहे.

देशव्यापी बंदमध्ये मालवाहू वाहतूक संघटनाही सहभागी झाल्या आहेत. यात इंधन, दूध आणि इतर द्रव पदार्थ वाहून नेणारे टँकर चालक, ट्रकचालकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे बंदचा परिणाम मंगळवारी सकाळीच दिसणार आहे. विदर्भातील सुमारे 80 लाख लिटर दुधाचा पुरवठा या बंदमुळे खोळंबणार आहे. याशिवाय 322 पैकी 95 टक्के इंधन पम्प मंगळवारी दुपारी कोरडे पडणार आहे.

पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अमित गुप्ता यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले की, वाहन चालकांनी बंद पुकारल्यानंतर सोमवारी (ता. 1) बोटांवर मोजण्याइतकेच टँकर विदर्भातील इंधन पम्पांवर पोहोचले. सोमवारी सायंकाळनंतर विदर्भातील सर्व पम्पांवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही ठिकाणी रात्रीपर्यंत इंधन साठा संपला आहे. शहरी भागातील अनेक पम्प कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात व महामार्गांवर असलेल्या पम्पांवर सध्या इंधनसाठा आहे, परंतु तो देखील मंगळवारी दुपारनंतर संपणार आहे.

दुधाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव खानदेश, मराठवाडा या भागातून मंगळवारी दुधाची पाकिटे घेऊन येणारी वाहने येणार नसल्याचा संदेश ठोक विक्रेत्यांना देण्यात आला आहे. विदर्भातील या सर्व ठोक विक्रत्यांनी याबाबत रिटेलर्सला कळविले आहे. मालवाहतूक बंद असल्याने तीन दिवसाच्या या बंदमुळे सामान्यांचे बऱ्यापैकी हाल होणार आहेत. याशिवाय विदर्भात अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी टायर जाळत रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने महामार्गांवरील वाहतुकीवरही बंदचा परिणाम दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर आणि अमरावती येथील परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक नियंत्रण कक्षाकडून विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महामार्गांवरील वाहतूक खोळंबणार नाही, यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. विदर्भातील महामार्गांवरील वाहतुकीवर नागपूर येथील पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके लक्ष ठेवून आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील मलकापूर, बाळापूर, अमानी, बडनेरा, धामणगाव, कारंजा, उमरखेड, चंद्रपूर, रामटेक, पाटणसावंगी, जाम, खुर्सापार, गाडेगाव, डोंगरगाव येथील महामार्ग सुरक्षा पथकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT