Nana Patole on Arms in Amravati & Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : अमरावती, नागपुरातील शस्त्रसाठ्याचा मुद्दा गाजला

Nana Patole : विधानसभेत उपस्थित केला ‘पॉइंन्ट ऑफ ऑर्डर’; खुलास करण्याचे आदेश

प्रसन्न जकाते

Illegal Arms : विदर्भातील अमरावती व नागपूर शहरात पकडण्यात आलेल्या मोठ्या शस्त्रसाठ्याचा मुद्दा मंगळवारी (ता. 12) हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत चांगलाच गाजला. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी ‘पॉइंन्ट ऑफ ऑर्डर’ केला. अमरावतीमध्ये पकडण्यात आलेला शस्त्रसाठा तर महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या कारवाईंपैकी सर्वांत मोठा आहे.

यापूर्वीही विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शस्त्रसाठा सापडण्याचे प्रमाण कायमच आहे. त्यामुळे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत याबाबत गृह विभागावर ताशेरे ओढले. सरकारने तातडीने यासंदर्भात स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.

उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा मार्गावरील पुलाखालील नाल्यात 150 पेक्षा अधिक काडतुसं आढळली. शनिवारी (ता. 9) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही काडतुसं आढळली होती.

गोरेवाडा मार्गावर एका नागरीकाला पुलाजवळ पिशवी पडलेली दिसली. त्यात ही काडतुसं भरून होती. त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहायक पोलीस आयुक्त डॉ.अभिजित पाटील, गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सगडे हे पुलाजवळ पोहोचले. बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हा साठा जप्त केला. या कामात दहशतवात विरोधी पथकाचीही (ATS) मदत घेण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती शहर पोलिसांनीही कारवाई करीत राज्यातील सर्वांत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. रविवारी (ता. 10) गुन्हे शाखा पोलिसांनी नागपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा घातला. छाप्यात 19 वर्षीय अब्दुल सोहेल अब्दुल शफी याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. अकरम खान ऊर्फ गुड्डु बादुल्ला खान (वय 19), फरदीन खान युसुफ खान (वय 21), मुजम्मील खान जफर खान (वय 21), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (वय 19), जाहेद शहा हमीद शहा (वय 20) यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत 102 खंजीर, चायना चाकु, 2 देशी कट्टे जप्त केले. मुंबईतून ही टोळी शस्त्र अमरावतीत आणत होती. महाराष्ट्रातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले.

आमदार नाना पटोले यांनी अधिवेशन काळात पकडण्यात आलेल्या या शस्त्रसाठ्याचा मुद्दा लाऊन धरला. गृह विभागाने व सरकारने यासंदर्भात तातडीने विधानसभेत निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही ठिकाणी पकडण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याच्या विषयाची गंभीरता पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला याबाबत तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता गृह विभागातील अधिकाऱ्यांनी नागपूर आणि अमरावतीच्या मुद्द्यावर माहिती घेण्यास सुरुवात केलीय.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT