Mahayuti Melava Amravati. Sarkarnama
विदर्भ

Amravati Mahayuti : अडसूळ, पोटे, बोंडे, खोडके, राणा यांचे गोडगोड बोला; बच्चूभाऊंचा कडवटपणा!

Amar Ghatare

Politics : एकेकाळचे कट्टर विरोधक आणि राजकीय प्रतिस्पर्धी महायुतीच्या महामेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र आले. इतकेच नव्हे तर वैरभाव विसर त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही उमलल्याचे दिसत होते. अमरावती शहरात रविवारी (ता. 14) हे चित्र बघायला मिळाले.

महायुतीमधील सर्वच घटक पक्षांचा महामेळावा शहरात पार पडला. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, प्रहार जनशक्ती पार्टी, युवा स्वाभिमान पक्षाचे नेत्यांचा महामेळाव्याच्या निमित्ताने महाकुंभ मंचावर दिसत होता. अगदी एकमेकांवर जहरी टीका करण्यापासून कोर्टकचेरी आणि पोलिसांपर्यंत प्रकरण नेणारे नेते यावेळी एकाच रांगेत बसले होते.

भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजित अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय खोडके, भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा यात समावेश होता. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला या सर्वांचे भाव निवडणूक आली गोडगोड बोला असेच होते. यात प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीने त्यांच्या मनात निर्माण झालेला कडवटपणा कायमच आहे की काय, असे संकेत देऊन गेला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा महामेळावा घेण्यात आला. महायुतीमधील 11 पक्षांचे नेते व कार्यकर्ते यात उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात आमदार रवी राणा यांचा जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी वाद रंगला. भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके हे यातून सुटले नाही. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्यासोबतचा टोकाचा वाद तर अगदी कोर्टकचेरीपर्यंत गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावतीमध्ये वादविवादाचे हे प्रसंग रंगत असतानाच महायुतीच्या निमित्ताने सर्वच नेत्यांनी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत आपल्या मनातील कडवटपणा मिटविला की काय, असेच त्यांच्या वर्तनावरून वाटत होते. निवडणुकीचा काळ जवळ असल्याने नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. यंदा त्यांना श्रीराम भक्ती पावत एखादे राज्यमंत्रीपद तरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्या जोरदार ताकदीने प्रयत्न करीत आहेत.

भाजप आणि राणा एकमेकांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्या महायुतीच्या प्रथम दावेदार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या उमदेवारीला दुजोरा दिला आहे. खासदार नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार असतील असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमरावती येथील महायुतीच्या मेळाव्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना गटाचे सर्व कार्यकर्ते व नेते यांचे आमदार रवी राणांसोबत कितीही वैर असले तूर्तास जुळवून घेऊ, असेच वर्तन होते.

बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती पार्टी देखील महायुतीत सहभागी आहे. बच्चू कडू यांना अमरावती लोकसभेची जागा हवी आहे. ती कदाचित त्यांना मिळणे अवघड आहे. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार कडू आधीच नाराज होते. आता लोकसभेच्या जागांवरूनही ते रूसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी महामेळाव्यातील अनुपस्थिती सर्वांना खटकली. अलीकडच्या काळात ते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

राज्यात 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायत व नगरपंचायती आहेत. त्याला सरकारकडून निधी मिळत नाही. भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची आहे तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे दुजाभाव करू नये. असे होत असल्यास 5 फेब्रुवारीला आपली भूमिका जाहीर करू, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना? अशी चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT