Congress & Prakash Ambedkar.
Congress & Prakash Ambedkar. Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : काँग्रेस-वंचितमधील दरी वाढली; उमेदवार मागे घेण्यासाठी अकोल्यात दबावतंत्र

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून महाविकास आघाडीचे वंचित बहुजन आघाडीसॊबत लोकसभेच्या जागावाटपाबाबत बोलणे सुरु होते. त्यामुळे यावेळेस आघाडी होईल, असे वाटत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीसोबत सुरु असलेली त्यांची बोलणी फिस्कटली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला गेल्या वेळेस पराभूत झालेल्या सात जागेवर काँग्रेस विरोधात उमेदवार देणार नाही अशी घोषणा केली होती. त्या बदल्यात काँग्रेस अकोल्यात त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत, असे वाटत होते.

2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी वंचितला अजिबात हलक्यात घेणार नाही असे वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीने शेवटपर्यंत वंचितशी जुळवून घेण्याची तयारी ठेवली होती. मात्र ऐनवेळेस वंचित आघाडीने महाविकास आघाडीशी जुळवून न घेता यंदाच्या निवडणुकीत वंचित पुन्हा स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत सुरु केली आहे.

दुसरीकडे वंचित बहूजन आघाडीने नागपूरसह सात लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे अकोला येथून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांमार्फत केली जात आहे.

वंचितने नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हे बघता वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी बुधवारी विकास ठाकरे यांची भेट घेतली. अकोल्यातून वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लढत असल्याने तेथून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विकास ठाकरे यांनी हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही, पक्षश्रेष्ठींना कळवते असे वंचितच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचितच्या पाठिंब्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यावर २०१९च्या निवडणूक लढवून भाजपला थेट मदत करणारे आंबेडकरच खरे हस्तक असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. आम्ही वंचित आघाडीला समर्थन मागितले नाही. त्यांना द्यायचे असल्यास सर्वच जागांवर द्या, असेही पटोले यांनी सुनावले आहे. त्यामुळे वंचितचे कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

काँग्रेस, वंचित आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadeetivar) यांनी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच असतात असे सांगून हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे प्रत्यक्षपणे सूचित केले आहे. या घाडमोडी घडत असताना काँग्रेसने अकोल्यात उमेदवार जाहीर केला आहे. आता आमच्या पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेसने (Congress) आपली उमेदवार मागे घ्यावी, अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांमार्फत केली जात आहे. या मुद्यावर काँग्रेस आणि वंचित आघाडी काय निर्णय घेते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Sachin Waghamre)

SCROLL FOR NEXT