Shivsena UBT News : शिवसेनेत फूट पडूनही ठाकरेंचा दरारा अन् मशालीची धग कायम!

Loksabha Election 2024 : एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे संपले, अशी टीका भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने केली जात आहे. आज मात्र वेगळीच परिस्थिती आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSARKARNAMA

Uddhav Thackeray Political News : शिवसेना फुटली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपले, अशी हाकाटी भाजप आणि शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील काही नेत्यांकडून पिटण्यात आली. शिवसेना फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटु्ंबीयांवर सातत्याने आरोप करण्यात आले. असे करताना भाषेची पातळी अनेकदा घसरली. इतके सारे होऊनही उद्धव ठाकरे यांचे राजकारण तग धरून आहे, किंबहुना ते आणखी फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. आयुष्यभर सत्तेची विविध पदे उपभोगलेले काँग्रेसचेही काही दिग्गज नेते भाजपच्या वळचणीला गेले आहेत. महायुतीत पक्षांची आणि दिग्गज नेत्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे कागदावर अत्यंत शक्तिशाली दिसणाऱ्या महायुतीत प्रचंड अंतर्विरोध निर्माण झाल्याचे चित्र दररोजच्या घडामोडींवरून दिसून येत आहे.

एकाच जागेवर अनेक नेते दावे करू लागले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला पेच सोडवणे भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. अशातच भाजपला धक्केही बसू लागले आहेत. जळगावचे खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Shivsena UBT News
Ambadas Danve On Hemant Patil : हेमंत पाटील तुम्हाला मातोश्रीवरचा सन्मान पचवता आला नाही. उमेदवारी जाताच दानवेंनी डिवचले..!

जळगावचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आणि करण पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे दोन पर्यायही होते, मात्र त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची निवड केली. शरद पवार गट आणि काँग्रेसला भवितव्य नाही, असा याचा अर्थ नसून, उद्धव ठाकरे यांचे राजकारणे संपले, आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य दोघेच शिवसेनेत राहतील, अशी टीका करणाऱ्यांसाठी ही चपराक आहे.

महायुतीतील शिवसेनेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय अवस्था झाली आहे, हे अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. मुख्यमंत्री शिंदे कधी नव्हे इतके भाजपसमोर हतबल झालेले दिसत आहेत. त्यांच्या काही विद्यमान खासदारांची त्यांनी जाहीर केलेली उमेदवारी बदलण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर येऊ घातली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळाली. ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि काही दिवसांतच देशात कोरोनाची लाट सुरू झाली. त्यामुळे लॉकडाऊन लागू झाला. या काळात उद्धव ठाकरे यांनीही घरी बसून काम सुरू केले. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर आजही भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून टीका केली जाते. कोरोनाच्या लाटेत भाजपशासित राज्यांत प्रचंड वाईट अवस्था होती.

उत्तर प्रदेशात तर गंगेतून मोठ्या संख्येने मृतदेह वाहून आल्याचे देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रात सर्वकाही आलबेल होते, असे नाही, मात्र भाजपशासित राज्यांपेक्षा स्थिती नक्कीच आटोक्यात होती. हे भाजपसाठी प्रचंड अडचणीचे ठरले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार कऱण्यात आला. त्यासाठी शिवसेनेतून फुटून मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचाही वापर करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हेळसांड चालवली आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदरासंघांत आम्ही म्हणू तेच उमेदवार द्यायचे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ठाकरे हे नाव नसल्याने भाजपसमोर त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली दिसत आहे. शिंदे यांनी जाहीर केलेलेही काही उमेदवार बदलावेत, असा दबाव त्यांच्यावर आहे. यात काही विद्यमान खासदारांचाही समावेश आहे. नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता भाजपने कट केला आहे. त्या ठिकाणी भाजपला सोयीचे ठरणारे अजितदादा गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपवण्यासाठी भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांची ही अवस्था असताना तिकडे ठाकरे गटात खासदार उन्मेष पाटील आणि करण पवार या भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे खासदार पाटील नाराज होते. त्यामुळे त्यांनी मशाल हाती घेतली. देश, राज्याच्या हितासाठी म्हणून भाजपमध्ये प्रवेश करतोय, असे अनेक नेते सांगतात. मात्र आज खासदार उन्मेष पाटील यांनी जे सांगितले ते वेगळेच आहे. वापरा आणि फेकून द्या, या भाजपच्या नीतीला कंटाळलो आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Shivsena UBT News
NCP Crisis News : शरद पवार गटाकडून 'घड्याळ'बाबत याचिका दाखल; अजित पवारांवर घेतला आक्षेप...

महायुतीत आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्या पक्षांची जी अवस्था आहे, ती पाहता लोकसभा निवडणुकीनंतर आणखी घडामोडी वाढतील, याची दाट शक्यता आहे. नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना आपल्या पक्षाचे दरवाजे बंद केल्याचे जाहीर करून संकटाच्या काळात सोबत राहिलेल्या निष्ठावंतांना ठाकरे गटाने दिलासा दिलासा दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Shivsena UBT News
Nanded Loksabha Constituency : 'अशोकराव तुम्ही गेलात, पण नांदेडची जनता...' ; वसंतराव चव्हाणांचा निशाणा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com