Chandrapur News: काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे यांचा बसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या व्हिडिओमध्ये श्याम बर्वे हे प्रतिभा धानोरकर यांच्या गालाला हात लावताना दिसत आहेत.
या घटनेवरून काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता स्वतः प्रतिभा धानोरकर यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
'श्यामभाऊ माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. बसमध्ये घडलेला प्रकार हा केवळ मस्करीचा भाग होता. माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही,' असे धानोरकर यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केले. या घटनेवरून चुकीच्या बातम्या पसरवून महिला खासदाराची बदनामी केली जात असल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला.
प्रतिभा धानोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टिट्यूशन क्लबपासून सर्व खासदार एकाच बसने रामलीला मैदानाकडे जात होते. यावेळी त्यांच्या शेजारी वर्षा गायकवाड बसल्या होत्या, तर शोभाताई बच्छाव समोरच्या सीटवर होत्या. श्याम बर्वे हे नवीन ड्रेस घालून आल्याने काही झारखंड आणि राजस्थानच्या खासदारांनी त्यांच्या लग्नाबाबत गंमतीने विचारणा केली.
यावर वर्षा गायकवाड यांनी श्याम बर्वे यांच्या वयाचा संदर्भ देत त्यांची मस्करी केली. त्यानंतर श्याम बर्वे यांनीही त्यावर विनोदाने प्रतिक्रिया दिली. 'माझा मुलगा २०-२२ वर्षांचा आहे, मी अजून ३० वर्षांचा व्हायचा आहे, माझं लग्न व्हायचं आहे,' अशा स्वरूपाची गंमत त्यांनी केली. याच संभाषणादरम्यान त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या गालाला हलकासा हात लावला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे धानोरकर यांनी सांगितले.
या व्हिडिओनंतर नागपूर काँग्रेस वर्कर या ई-मेल आयडीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. या घटनेमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आल्याची चर्चा आहे.
मात्र, तक्रार करणारी व्यक्ती कोण आहे, याची माहिती नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले. अधिकृत तक्रार किंवा तक्रारदाराचे नाव नसताना अशा बातम्या प्रसारित करणे चुकीचे असल्याचेही त्या म्हणाल्या. संबंधित व्यक्ती श्याम बर्वे, वर्षा गायकवाड किंवा स्वतःच्या विरोधातील असू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सर्व खासदार एकाच ठिकाणी राहतात, एकत्र जेवतात आणि त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे सांगत धानोरकर यांनी या घटनेला वेगळे स्वरूप देऊ नये, असे आवाहन केले. दिल्लीत सुरू असलेल्या मोठ्या आंदोलनासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी या छोट्या घटनेला महत्त्व दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.