

Nagpur News : अखिल भारतीय महिला काँग्रेसने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्रासह मिझोरम, उत्तर प्रदेश या तीन राज्यांत नवीन हंगामी (अॅक्टिंग) अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या संघटनात्मक नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नागपूरच्या महिला नेत्या सुनीता गावंडे यांची महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव म्हणून काम पाहणाऱ्या गावंडे यांच्यावर आता राज्यातील महिला संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात महिला काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मिझोरममध्येही नव्या चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून महिला काँग्रेस अधिक सक्रिय करण्याचा आणि संघटनेला नव्याने बळ देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
सुनीता गावंडे यांना राजकीय आणि संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी काम केले आहे. २००२ ते २००५ या कालावधीत त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर २००५ ते २०१६ अशी सलग ११ वर्षे त्या नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष होत्या. या काळात ग्रामीण भागातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले.
त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक कामाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
सुनीता गावंडे या उच्चशिक्षित असून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. राजकीय अनुभवासोबतच शैक्षणिक पार्श्वभूमी आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून गावंडे यांच्यासमोर राज्यभरातील महिला काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आव्हान असणार आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, नव्या महिलांना पक्षाशी जोडणे आणि काँग्रेसची भूमिका ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांपर्यंत पोहोचवणे, अशी महत्त्वाची कामे त्यांना करावी लागणार आहेत.
अलीकडेच नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला. या निकालानंतर नागपूरमधीलच सुनीता गावंडे यांच्याकडे महिला काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वाची जबाबदारी आल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला काँग्रेस किती प्रभावीपणे संघटन विस्तार करते, याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रासोबतच मिझोरम आणि उत्तर प्रदेशमधील महिला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी खालील नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे:
मिझोरम: झोडिंगपुई (Zodingpui)
उत्तर प्रदेश: शाहला अहरारी (Shahla Ahrari)
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मंजुरीने संबंधित राज्यांमध्ये नियमित (रेगुलर) अध्यक्षांची निवड होत नाही, तोपर्यंत हे सर्व पदाधिकारी आपल्या पदाची धुरा सांभाळतील, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.