Rajendra Mulak, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Rajendra Mulak News : राजेंद्र मुळकांनी काँग्रेस नेत्यांसह गाठले 'मातोश्री' ; रामटेकमधून निवडणूक लढणार?

Ramtek Assembly Constituency : रामटेकमध्ये मोठा बदल होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

Rajesh Charpe

Ramtek News: उद्धव ठाकरे यांनी उमेदवार यादी जाहीर करून रामटेक विधानसभा मतदारसंघावर आपल्या पक्षाचा दावा ठोकला आहे. सोबतच उमेदवारसुद्धा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून ती दूर करण्यासाठी सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेंद्र मुळक, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे हे मुंबईला उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

त्यांच्या भेटीगाठीचे वृत्त अद्याप बाहेर यायचे असले तरी रामटेकमध्ये मोठा बदल होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. मुळक यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढण्याचीही तयारी असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे(Congress) जिल्हाध्यक्ष, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक रामटेकमधून लढण्यास उत्सुक आहेत. दहा वर्षांपासून ते या मतदारसंघात काम करीत आहे. 2019च्या निवडणुकीत त्यांचे नाव जवळपास फायनल झाले होते. मात्र वेळेवर दिल्लीतून सूत्रे फिरली आणि त्यांच्याऐवजी गुज्जू यादव यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. यानंतरही त्यांनी रामटेक मतदारसंघात काम करणे सुरूच ठेवले. यावेळी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र महाविकास आघाडीमुळे त्यांची अडचण झाली आहे.

रामटेक विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सेनेचे दावा आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल यापूर्वी तीन वेळा निवडून आले होते. मागील निवडणुकीत ते अपक्ष लढले होते आणि निवडूनसुद्धा आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांची उमेदवारीसुद्धा जाहीर झाली आहे.

रामटेक मतदारसंघातील एका कार्यक्रमाला आले असताना मुख्यमंत्र्यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. तर परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने भाजपनेही नाराजी व्यक्त केली होती. येथील भाजपचे दावेदार आणि माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जाहीरपणे जयस्वाल यांना विरोध दर्शवल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना भाजपातून निलंबित करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी(MVA)मुळे राजेंद्र मुळक यांचे सँडविच झाले आहे. रामटेक सोडणार नसाल तर आमच्या उमेदवाराला तिकीट द्या अशा वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. राजेंद्र मुळक उमरेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांनी रामटेक मतदारसंघात आपले बस्तान हलवले. यापूर्वी ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर गेले होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते अर्थराज्यमंत्री होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT