Subhash Dhote Sarkarnama
विदर्भ

Rajura Constituency News : १० तहसीलदार बदलले, आमदार सुभाष धोटे गोंडपिपरीचा किती अंत बघणार?

Gondpipari : प्रभारी अधिका-यांच्या भरवशावरच तालुक्याचा कारभार कसाबसा सुरू आहे.

संदीप रायपूरे

Chandrapur District Political News : सुभाष धोटे यांच्या आमदारकीचा पाच वर्षांचा कालावधी अद्यापही पूर्ण व्हायचाच आहे. मात्र या काळात गोंडपिपरी तालुक्यात तब्बल १० तहसीलदार बदलले. नगरपंचायतीत सुरुवातीचा एक अधिकारी सोडला तर प्रभारी अधिका-यांच्या भरवशावरच तालुक्याचा कारभार कसाबसा सुरू आहे. (The administration of the taluk is going on smoothly on the trust of the in-charge officers)

नियमित अधिकारी नसल्याने नागरिकांनी मोठी अडचण होत आहे. अशावेळी आमदार सुभाष धोटे गोंडपिपरीसारख्या मागास तालुक्याचा अजून किती अंत बघणार, असा प्रश्न विचारला जात आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणा-या गोंडपिपरी व जिवतीच्या विकासाकडे सत्ताधारी आमदारांनी प्रत्येक वेळी दुर्लक्षच केले आहे. सध्या काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२०१९मध्ये सुभाष धोटे शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांचा पराभव करत आमदार झाले. धोटे आमदार झाल्यापासून आतापर्यत तब्बल १० तहसीलदार बदलून गेले. यांपैकी अनेकांकडे तर प्रभारच होता. काही तहसीलदार रुजू झाले अन् मेडिकल टाकून गेले ते पुन्हा गोंडपिपरीला परत आलेच नाही. एक वेळ तर अशी आली की गोंडपिपरीच्या तहसीलदारपदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी सांभाळला.

काही काळ पोंभुर्ण्याचे तहसीलदार शिवाजी कदम यांच्याकडेही गोंडपिपरीचा प्रभार देणार आला होता. नुकताच गोंडपिपरीच्या तहसीलदारपदाची जबाबदारी पांडुरंग माचेवाड यांच्याकडे सोपविण्यात आली. माचेवाड हे चंद्रपुरात सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते गोंडपिपरीला कितपत न्याय देतील, हा मोठा प्रश्‍न आहे.

२०१५मध्ये राज्यात नगरपंचायतींची स्थापना झाली. गोंडपिपरी नगरपंचायत झाल्यानंतर सचिन राऊत हे पूर्णवेळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. काहीच दिवसांत त्यांची बदली झाली अन् तेव्हापासनूच मुख्याधिका-यांची जबाबदारी प्रभारींच्या खांद्यांवर आहे. सध्या पोंभुर्ण्याचे मुख्याधिकारी आशिष घोडे हे गोंडपिपरी नगरपंचायतीच्या मुख्याधिका-याची जबाबदारी पार पाडत आहेत. पण प्रभार असल्यामुळे ते या पदाला न्याय देऊ शकले नाही. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या इमारतीचे काम अनेक वर्षांपासून झाले नाही. पण याकडे कुणाचेच लक्ष नाही.

तिकडे दक्ष, इकडे दुर्लक्ष..

आमदार सुभाष धोटे हे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी ते उत्तमरीत्या पार पाडीत आहेत. कॉंग्रेसच्या संघटनाची कामे ते चांगल्यापैकी करीत आहेत. पण गोंडपिपरीला नियमित अधिकारी ते मिळवून देऊ शकले नाहीत.

अधिका-यांच्या दुर्लक्षितपणामुळे गरीब शेतकरी बांधवांना मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या मदतीकरिता तहसील कार्यालयात पन्नासदा चकरा माराव्या लागत आहेत. पण याकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांसह कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे तिकडे दक्ष अन् इकडे मात्र दुर्लक्ष, अशी परिस्थिती आमदारांच्या बाबतीत झाली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT