नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा पठण’ आंदोलनादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर निधीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. या सभेत त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांच्या वक्तव्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप भर सभेत ऐकवत तीव्र शब्दांत निशाणा साधला.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र सरकारच्या निर्णयांबाबत किंवा घडामोडींवर प्रश्न उपस्थित केला की लगेच देशद्रोहाचे आरोप लावले जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राम मंदिरासाठी देशभरातील लाखो भाविकांनी श्रद्धेने योगदान दिले असून त्या निधीबाबत निर्माण झालेल्या शंकांचे उत्तर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला की, राम मंदिर ही कोणाची खाजगी मालमत्ता किंवा बापाची जहागीर नाही.
ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत त्यांनी म्हटले, "ज्यांनी खऱ्या श्रद्धेने पैसे दिलेले नाहीत त्यांचेच पैसे चोरीला गेले आहेत, आमचे पैसे सुरक्षित आहेत." या विधानावर आक्षेप घेत ठाकरे म्हणाले, "राम मंदिर ही कोणाच्या बापाची जहागीर नाही. आम्ही सुद्धा रामभक्त आहोत."
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचाही त्यांनी उल्लेख केला. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, मात्र त्या कार्यक्रमात एकही शंकराचार्य सहभागी नव्हता, असे त्यांनी सांगितले. त्याच दिवशी आपण नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात उपस्थित होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काळाराम मंदिराचा इतिहास सांगताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाची आठवण करून दिली. "हा राम सर्वांचा आहे" आणि प्रत्येकाला त्याचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे, हा संदेश त्यातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच 23 जानेवारीच्या सभेत आपण स्पष्टपणे सांगितले होते की, "आम्ही जय श्रीराम आणि जय शिवराय नक्कीच म्हणतो, पण आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे." हे आंदोलन त्याच भूमिकेचा पुढचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिरातील कथित चोरीचा मुद्दा हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा विषय नसून हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि भावनांवर झालेला आघात असल्याचे ठाकरे म्हणाले. "आता हिंदू कोणाला माफ करणार नाही. हिंदू आता केवळ जागा झालेला नाही तर तो पेटून उठला आहे," असे सांगत त्यांनी उपस्थितांना या प्रकरणावर आवाज उठवण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.