

Latur News : वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा नीटचा पेपर फुटल्याने देशभरात संतापाचे वातावरण आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन पेटले आहे. अशावेळी नीटच्या दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नीट पेपरफुटीचे केंद्रबिंदु ठरलेल्या लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत बाजी मारली आहे.
लातूर जिल्ह्यातील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा क्रॅक करत वैद्यकीय महाविद्यालयातील आपले प्रवेश निश्चित केले आहेत. लातूर मधील बहुतांश महाविद्यालयातील विविध खाजगी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशानंतर पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. नीट पेपरफुटीनंतर लातूरच पॅटर्नवर प्रश्न उपस्थितीत केले जात होते. विद्यार्थ्यांनी मात्र घवघवीत यश मिळवत टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.
नीट पेपर फुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत पोहचले होते. शिवराज मोटेगावकर याच्यासह अनेक प्राध्यापकांना या प्रकरणी लातूरमधून अटक करण्यात आली आहे. हे सगळे आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत. या पार्श्वभूमीवर नीटचा लागलेला निकाल आणि त्यात लातूरच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकाचा विषय ठरत आहे.
शाहू महाविद्यालयाचे तब्बल 540 विद्यार्थ्यांसह, दयानंद महाविद्यालय आणि बसवेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही निकालात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, NEET-UG पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेला शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसचा निकालही दरवर्षीप्रमाणे घवघवीत लागल्याचा दावा करण्यात येत आहे.
क्लासेसच्या माहितीनुसार, 36 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण, तर तब्बल 500 विद्यार्थ्यांनी 550 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी असलेला शिवराज मोटेगावकर याचा मुलगा आणि लातूरमधील दोन डॉक्टरांसह तिघांचा NEET-UG 2026 चा निकाल सध्या राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.