Ramtek Lok Sabha Election 2024 : माजी मंत्री सुनील केदार नागपूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. त्यांच्यावर झालेली कारवाई आणि कोर्ट कचेऱ्यानंतर ते बॅकफूटवर जातील, अशी कुजबूज सुरू झाली होती. पण केदार त्याच ताकदीने पुढे सरसावले आहेत. आता त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे नाव त्यांनी पुढे केले आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून महिला आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी माजी मंत्री सुनील केदार व त्यांच्या समर्थकांनी केली. तसा प्रस्तावसुद्धा ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत ठेवण्यात आला. यावरून मोठे मतभेद उफाळून आल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या बैठकीत केदार समर्थकांनी परस्पर उमेदवार ठरवत असल्याने काहींनी नाराजी दर्शवली. बर्वे यांच्यासह अर्ज सादर केलेल्या सर्व इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, किशोर गजभिये, जि.प. उपाध्यक्षा कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, मिलिंद सुटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, तक्षशीला वाघधरे, गज्जू यादव, नाना कंभाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ग्रामीण काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली होती. बूथ कमिट्यांचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर जि.प. उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेसकडून महिलांना ३३ आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती. याकडे लक्ष वेधून त्यांनी रामटेकपासून याची सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी केली.
केदार यांच्या समर्थकांनाही त्यांच्या सुरात सूर मिळवला. केदार विरोधकांनी बर्वे यांच्या नावाला विरोध दर्शवला. रामटेक लोकसभेकरिता उमेदवारी अर्ज करणाऱ्या सर्वांची नावे वरिष्ठांकडे पाठवण्याची सूचना केली. सुनील केदार यांनीसुद्धा पुढाकार घेऊन बर्वे यांचे नाव रेटले. उमेदवाराचे नाव अंतिम करण्याचा निर्णय संसदीय समितीचा आहे. परंतु केदारांनी थेट उमेदवारच घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
आधीच सूचना..
सुनील केदार यांनी 8 ते 10 दिवसांपूर्वी काही मोजक्या समर्थकांची बैठक बोलावली होती. यात त्यांनी रश्मी बर्वेंचे यांच्यासाठी प्रचाराला लागण्याची सूचना केली असल्याचे समजते. केदार नेहमीच दबावाचे राजकारण करतात. रामटेकमधून अनेक इच्छुक आहेत. त्यांनी अर्जही सादर केले आहेत. त्या सर्वांच्या नावांचा प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी मागणी केदार विरोधकांनी बैठकीत केली. विशेष म्हणजे माजी पालकमंत्री व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत आणि सनदी अधिकारी व प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये हेसुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.