Nitin Gadkari, Manohar Kumbhare, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadanvis and Sunil Kedar Sarkarnama
विदर्भ

Ramtek Lok Sabha Election : कुंभारेंच्या माध्यमातून भाजपने साधला सुनील केदारांवर नेम !

Sunil Kedar : भाजपची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येते न येते तोच सुनील केदारांचे खंदे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांना भाजपने गळाला लावले.

सरकारनामा ब्यूरो

Ramtek Lok Sabha Election : भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला संपवण्याचा निश्‍चय केलेला दिसतोय. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देऊन रामटकेमध्ये काँग्रेसच्याच विरोधात मैदानात उतरवले. येथे काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थक रश्‍मी बर्वे यांच्यासोबत त्यांचा मुकाबला आहे. भाजपची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येते न येते तोच सुनील केदारांचे खंदे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांना भाजपने गळाला लावले.

निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला त्यातल्या त्यात सुनील केदार यांना हा पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. आमदार राजू पारवेंनंतर मनोहर कुंभारे यांनी कॉंग्रेसला हात दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला. कुंभारे यांच्या माध्यमातून भाजपने केदारांवरच नेम साधल्याची चर्चा होत आहे. याचा ग्रामीण भागातील राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना येणाऱ्या विधानसभेत सावनेरमधून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कुंभारे गेल्या अनेक दशकांपासून केदार यांच्यासोबत आहेत. ते त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिन्यापासून जिल्हा परिषदेत त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रातोरात घेतला निर्णय...

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत कुंभारे जिल्हा परिषद सदस्यांसोबत होते. त्यानंतर सकाळी त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. रात्रीच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही दिवसांपूर्वी घडलेली घटना महत्त्वाची ठरल्याची चर्चा होत आहे.

गडकरींच्या घरी प्रवेश...

काल, बुधवारी सकाळी मनोहर कुंभारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. नितीन गडकरी आणि सुनील केदार यांचे संबंध चांगले आहेत. दोघेही निवडणुकीत अप्रत्यक्षणपणे एकमेकांना साथ देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्याच घरीच प्रवेश करून एक प्रकारे फडणवीस यांनी गडकरींवर राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा होत आहे.

गटबाजीच्या राजकारणाला कंटाळलो...

पक्ष सोडल्यानंतर मनोहर कुंभारे यांनी सुनील केदारावर निशाणा साधला. केदार यांच्या गटा-तटाच्या राजकारणाचा फटका विकासाला बसला आहे. धनोजे कुणबी समाजावर अन्याय होत असल्याने सावनेरच्या विकासासाठी मोठा निर्णय घ्यावा लागला, असे कुंभारे यांनी सांगितले. सावनेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारास ३० ते ४० हजार मतांची आघाडी राहील, असा विश्वास व्यक्त करीत कोणत्याही पदाची लालसा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत राहणार असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT