Raju Parve Sarkarnama
विदर्भ

Ramtek Lok Sabha Election : भाजपचा ‘हा’ अट्टहास महागात पडणार, कार्यकर्ते राजीनामे देण्याच्या मनःस्थितीत !

सरकारनामा ब्यूरो

Ramtek Lok Sabha Election : 2019च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारीबाबत प्रचंड गोंधळ झाला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार फायनल होत नव्हता. अखेर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केलेली यादी बदलून ऐन वेळी शिवसेना नेते दिवंगत बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. तो निर्णय योग्यही ठरला अन् बाळू धानोरकर खासदार झाले होते. या निवडणुकीत भाजपने काहीसा तसाच घोळ रामटेक मतदारसंघात घालून ठेवला आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून उमेदवार आयात केला जात असल्याच्या चर्चेने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आमदार राजू पारवे यांची उमेदवारी लादल्यास राजीनामे देण्याची तयारी अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे. रामटेकच्या उमेदवारीवरून सध्या प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शिंदे सेना हा मतदारसंघ सोडायला तयार नाही, तर भाजपला कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचा आहे. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना उमेदवारच जाहीर झालेला नाही.

युतीत असताना शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी हा मतदारसंघ सलग दोन वेळा जिंकला आहे. आता ते शिंदे सेनेत आहेत. मात्र, भाजपचा त्यांच्या नावाला विरोध आहे. या मतदारसंघात भाजपच लढेल असे नेत्यांमार्फत सुरुवातीपासूनच सांगण्यात येत होते. त्यानुसार पक्षाने तयारी केली होती. अनेक इच्छुकांनी छुपा प्रचारही सुरू केला आहे. उमरेडमधील काँग्रेसचे आमदार राजू पारवे भाजपत येणार आणि रामटेकमधून लढणार अशी चर्चा दोन महिन्यांपासून सुरू आहे. मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातो. मात्र, शिवसेना जोपर्यंत या मतदारसंघावरचा हक्क सोडत नाही, तोपर्यंत प्रवेश करणार नाही अशी अट त्यांनी घातली असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी देणारच नसेल तर भाजपत जायचे कशाला अशी त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे शिवसेना रामटेकसाठी अडून बसली आहे. त्यांना उमेदवार बदलवा अशी सूचना करण्यात आली असल्याचे समजते. शिवसेनेला मतदारसंघ सोडायचा नसेल तर राजू पारवे यांना उमेदवारी द्या, असा प्रस्ताव भाजपने दिल्याचे समजते. या ओढाताणीत भाजपच्या कार्यकर्त्यांची सर्वाधिक घुसमट होत चालली आहे. बाहेरचा उमेदवार लादल्यास राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली असल्याचे समजते. याकरिता गावागावांमध्ये बैठका सुरू आहेत. त्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. भाजपच्या एका नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सांगितले.

शिंदे सेना करणार बंडखोरी...

खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. रामटेक मतदारसंघाचे संघटक अमोल गुजर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. आपल्यासोबत १५० पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोबतच रामटेकमधून लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT