Sunil Kedar, Rashmi Barve and Shyamkumar Barve Sarkarnama
विदर्भ

Ramtek Lok Sabha Election : कुरघोडीत महायुतीची काँग्रेसवर मात, सुनील केदार काय करणार, याकडे लक्ष !

सरकारनामा ब्यूरो

Ramtek Lok Sabha Election : नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांचे नाव रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांनी पुढे केले. तेव्हापासूनच त्या चर्चेत आल्या. कारण सुरुवातीलाच पक्षातून त्यांच्या नावाला विरोध झाला. पण सुनील केदार बर्वे यांच्या नावावर ठाम होते आणि त्यांनी रश्‍मी बर्वे यांच्यासाठी तिकीट आणलेच. पण राजकीय कुरघोडीत महायुतीने त्यांच्यावर मात केली आणि त्यांचा उमेदवारी अर्जच अवैध ठरवला. रर्श्‍मी बर्वे यांची महायुतीने एवढी धास्ती का घेतली, हा प्रश्‍न अजूनही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

सुनील केदार मुत्सद्दी नेते आहेत. नागपूर जिल्हा परिषदेवर त्यांनी सत्ता आणली होती. त्या पाठोपाठ नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरही आपला झेंडा फडकावला होता. राज्याचे पशुसंवर्धनमंत्री असताना आणि त्यापूर्वीसुद्धा त्यांनी नागपूर जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसचे संघटन मजबूत केले होते. त्या बळावरच त्यांनी रश्‍मी बर्वेंसाठी उमेदवारी आणली होती. पण राजकीय कुरघोडीत मात्र त्यांना मात खावी लागली. पण ते जिद्दी आहेत. एवढ्या सहजासहजी ते ही निवडणूक हातची सोडणार नाहीत. रश्‍मी बर्वे नाही तर त्यांचे पती श्‍यामकुमार बर्वे यांच्यासाठी ते सर्व शक्ती पणाला लावतील. त्यांची जादू चालल्यास रामटेकमध्ये चमत्कार बघायला मिळेल, असे राजकीय जाणकार सांगतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने आता त्यांच्याऐवजी श्यामकुमार बर्वे निवडणूक लढणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का असला तरी सुनील केदार जोर लावणार यात शंका नाही. आता ते किती जोर लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रश्मी बर्वे यांच्याकडे असलेले जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने काँग्रेसच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आधीच आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून रश्मी बर्वे यांच्यासह त्यांचे पती श्याम बर्वे यांचाही अर्ज दाखल करून ठेवला होता. त्यांच्या अर्जासोबत ए.बी. फॉर्मसुद्धा जोडला होता. त्यामुळे काँग्रेसकडे दुसरा पर्याय नव्हता, अन्यथा कोणालातरी समर्थन दर्शवण्याची वेळ काँग्रेसवर आली असती.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या रश्मी बर्वे या तगड्या उमेदवार मानल्या जात होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी विरोधकांतर्फे खटाटोप सुरू होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेपही घेण्यात आला होता. एका अधिकाऱ्याने त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयात धाव घेऊन बर्वे यांनी हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले. या सर्व घडामोडी घडत असताना तसेच जात प्रमाणपत्राची टांगती तलवार असतानाही काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रश्मी बर्वे या केदारांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळावी, याकरिता केदारांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अंगावर घेतले होते. विरोधकांनाही धास्ती निर्माण झाली होती. महायुतीने काँग्रेसचे उमरेडचे आमदार यांना शिवसेनेत आणून त्यांना उमेदवारी दिली. यासाठी खासदार कृपाल तुमाने यांना डच्चू देण्यात आला. राजकीय कुरघोडीत महायुतीने लढाईपूर्वीच काँग्रेसवर मात केली आहे. तगड्या उमेदवाराला रिंगणातून बाद केले. हे बघता महायुतीच्या पारवेंसाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे बोलले जात आहे. आता सुनील केदार काय करणार आणि प्रत्यक्ष निवडणुकीत आता रामटेकची जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT