विदर्भ

Ramtek Loksabha Constituency Election : ...तर भाजपचे कार्यकर्ते वेगळा विचार करतील, रामटेकमध्ये ‘पोस्ट’ होतेय व्हायरल !

Congress MLA Raju Parve : निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसच्या आमदाराला इतर पक्षाच्या व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यास तीव्र विरोध करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ramtek Loksabha Constituency Election : रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार काही केल्या ठरत नाही. विद्यमान खासदार शिंदे गटात सामील झालेले कृपाल तुमाने यांच्या नावाला भाजपची ना आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना भाजपकडून लढवण्याची खेळी भाजप नेते करण्याच्या विचारात आहेत. पण भाजपच्या या खेळीला शिंदे गटासह भाजप कार्यकर्त्यांचाही विरोध होत आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील ‘भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता’ या नावाने ही पोस्ट व्हायरल होते आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ही पोस्ट वेगाने पाठवली जात असल्याची माहिती आहे. यामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसच्या आमदाराला इतर पक्षाच्या व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात तीव्र विरोध करण्यात आला आहे. असे झाल्यास भाजपचे निष्ठावान कार्यकर्तेसुद्धा वेगळा विचार करतील किंवा ‘नोटा’कडे वळतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहे पोस्टमध्ये ?

‘साहेब सप्रेम नमस्कार,

विषय : रामटेक लोकसभेच्या जागेविषयी

मी भाजपचा पदाधिकारी - कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांपासून आमचे संपूर्ण कुटुंब सुरुवातीपासून भाजपचे काम करीत असल्यामुळे माझा जन्मसुद्धा भाजपतच झाला, असे म्हटल्यास ते खोटे ठरणार नाही. देशाचे पंतप्रधानपद असो की मुख्यमंत्रिपद किंवा गावातील साधे सरपंचपद असो. त्यावर केवळ भाजपचा कार्यकर्ता आरूढ व्हावा, अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यासाठी आम्ही निःस्वार्थपणे राबत असतो. जेव्हा संपूर्ण देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि फक्त काँग्रेस पक्षाचे साम्राज्य होते. तेव्हा असंख्य कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करत आपल्या पक्षाचे संघटन उभे केले. तेव्हा कुठे संसदेत दोन खासदार असलेला भाजप आज ४०० पारचा नारा देत आहे, ते केवळ असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज मात्र रामटेकच्या जागेविषयी आपण जो निर्णय घेतला. तो कोणत्याही भाजप कार्यकर्त्याला पटणारा नाही. (शिंदे सेनेलासुद्धा पटेल, असे मुळीच वाटत नाही) कारण आपल्याच पक्षात सलग ३० वर्षांपासून प्रामाणिक काम करणारे सुधीरजी पारवेसाहेब आणि १८ वर्षांपासून काम करणारे अरविंदजी गजभियेसाहेब आहेत. सुधीरजी पारवे तर दहा वर्षे आमदार राहिले आहेत. केवळ कामठीमध्ये पक्षाने तिकीट कापल्याचा जातीय राजकारणाचा परिणाम सुधीरजी पारवे यांच्या पराभवाचे कारण ठरले. गजभियेसाहेब यांच्यासारखा निष्ठावंत खरा बौद्ध समाजाचा एकनिष्ठ कार्यकर्तासुद्धा आपल्या पक्षात आहे. असे असताना काँग्रेसच्या एका आमदाराला निमंत्रण देऊन तिकीट देणे योग्य नाही.

तुमच्या या निर्णयाचे आम्ही समर्थन करू शकत नाही. भाजप कार्यकर्त्याचे मत फक्त भाजपलाच जाते. ते फुटत नाही, असा विश्वास सर्वांना आहे. याही निवडणुकीत तो शाबूत राहील. मात्र याचा अर्थ काँग्रेसच्या आयात उमेदवाराला आम्ही मतदान करू असे ग्राह्य धरू नका. कारण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिल्यास आम्ही पर्यायी नोटाचे बटण दाबायला मोकळे आहोत. ज्या काँग्रेसच्या आमदाराला आपण तिकीट देऊन लढवू इच्छिता आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आपल्याला वाटते. त्या काँग्रेस आमदाराचे आपण सर्वप्रथम सामाजिक मूल्य काय? तो पुन्हा विधानसभा निवडणुकीत जिंकून येऊ शकतो का? ज्या काँग्रेस पक्षातून तो आपल्या महायुतीत येत आहे. त्या काँग्रेस पक्षात या आमदाराचे स्थान काय? तेथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मत आणि भूमिका काय? याची माहिती घेऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे.

पक्षाने कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्याचे मन आणि मत जाणून न घेता थेट निर्णय घेण्याचा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनीसुध्दा आपला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा तिस-यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी संपूर्ण भारतवर्षाची मनोमन इच्छा आहे. मात्र त्यामुळे पक्षाने रामटेक लोकसभेत कोणताही उमेदवार उतरवला तरी चालेलच, असे नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या भूमीत आणि भगवान श्रीरामचंद्रजींच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या रामटेक लोकसभेच्या जागेसाठी आम्हाला आपल्याच पक्षातील लढवय्या उमेदवार द्यावा. हीच विनंती.

'प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि शेवटी स्वत:' हे ब्रिद सोबत घेऊनच माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते पक्षासाठी राबत आहेत, याची आपण दखल घ्यावी. शेवटी पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो की, आपल्याच प्रामाणिक कार्यकर्त्याचा विचारा व्हावा. अन्यथा कार्यकर्तेसुद्धा वेगळा विचार करतील. हा पत्रप्रपंच जरा कठोर असला तरी कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत. यातून कोणत्याही आदरणीय वरिष्ठ नेत्यांच्या भावना दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही. मात्र, जोपर्यंत आम्ही आपल्या भावना बोलून दाखवणार नाही, तोपर्यंत पक्षालासुध्दा आमच्या मनातील कालवाकालव कळणार नाही. काही चुकले असल्यास क्षमस्व... मात्र तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिल्यास मग आमचाही निर्णय पक्का आहे.

आपला,

भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता, रामटेक लोकसभा क्षेत्र'

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT