Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीची स्थितीही महाविकास आघाडीपेक्षा काही वेगळी नाही. कारण उमेदवाराच्या बाबतीत महाविकासप्रमाणेच येथे महायुतीचेही भिजत घोंगडे कायम आहे. नामनिर्देश दाखल करण्याच्या दुसरा दिवस उलटला आहे. तरीही रामटेकच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिंदे गट एकवेळ उमेदवार बदलेल, पण गड सोडणार नाही, या जिद्दीला पेटला आहे. तर भाजप अजूनही चाचपणी करत आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार कृपाल तुमाने हवे की आमदार राजू पारवे यांची चाचपणी भाजपकडून अजूनही केली जात आहे. विविध पदाधिकाऱ्यांना याबाबत फोनवरून विचारणा केली जात आहे. रामटेकचा पेच अद्याप कायम आहे. महायुतीमध्ये शिंदे सेना रामटेकवरचा दावा सोडायला तयार नाही.
भाजपचा कृपाल तुमाने यांच्या नावाला विरोध आहे. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्याची भाजपची इच्छा आहे. पारवे यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा उपस्थित होते. बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी मन मोठे करावे आणि रामटेक भाजपला द्यावा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजू पारवे आणि उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांनाही चर्चेसाठी बोलावून घेतले होते, अशीही सूत्रांची माहिती आहे. पारवे यांना उमेदवारी दिल्यास काय परिणाम होतील, याचीच चाचपणी सध्या भाजपच्या वतीने केली जात आहे. याकरिता रामटेक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत सदस्यांना फोन केले जात आहेत. राजू पारवे हवे की कृपाल तुमाने, शिवसेनेने लढावे की भाजपने असे विविध प्रश्न विचारून कौल जाणून घेतला जात असल्याचे समजते.
एकूणच भाजपची स्थितीसुद्धा संभ्रमात असल्याचे यावरून दिसून येते. भाजपने नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, शेजारीच असलेल्या रामटेकचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. शिवसेनेचे कृपाल तुमाने येथून दोन वेळा निवडून आले आहेत. पूर्व विदर्भात रामटेक हा एकमेव लोकसभा मतदारसंघ सेनेकडे आहे. तो हातचा जाऊ देऊ नका, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रामटेकचे शिवसैनिकसुद्धा आशेवर आहेत.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.