Amravati Politics : राज्यसभा उमेदवारीवरून सुरू झालेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्याचा दावा केल्यानंतर, त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
शिंदे यांनी अनेकदा शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, असा दावा रवी राणा यांनी केल्याने महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीतील राज्यसभेच्या रिक्त जागेवर नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र अखेर त्यांना संधी मिळाली नाही. यानंतर नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता रवी राणा यांनीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेत येण्याची ऑफर मिळाल्याचे सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, विदर्भातील शिवसेना (Shivsena) नेते बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाला राज्यसभेची संधी मिळायला हवी होती, असे मत व्यक्त केले होते. तसेच, एकनाथ शिंदे साहेब दोन पावले पुढे येतील, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी राणा दाम्पत्याला शिवसेनेत येण्याचे अप्रत्यक्ष निमंत्रण दिल्याची चर्चा रंगली होती.
माध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मला विदर्भ आणि अमरावतीच्या राजकारणाच्या दृष्टीने तसेच पक्षवाढीसाठी शिवसेनेत या आणि काम करा, अशी ऑफर दिली होती. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावान सैनिक आहे. जोपर्यंत राजकारणात देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मी त्यांच्यासोबतच ताकदीने काम करणार आहे. मी कुठेही जाणार नाही. तसेच, एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही राणा यांनी नमूद केले.
राज्यसभा उमेदवारीबाबत बोलताना रवी राणा म्हणाले की, नवनीत राणा यांना भाजपकडून राज्यसभा मिळावी, अशी अनेकांची इच्छा होती. देवेंद्र फडणवीस यांचीही तीच भूमिका होती. आम्ही ही बाब सुनेत्रा पवार यांनाही सांगितली होती. मात्र ही जागा भाजपच्या वाट्याची नसल्याने संधी मिळू शकली नाही. ते पुढे म्हणाले, या जागेसाठी देवेंद्र फडणवीस सकारात्मक होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नवनीत राणा यांनी निवडणूक लढवावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे अखेरीस दुसऱ्या उमेदवाराचा पर्याय निवडण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याबाबत विचारले असता रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मला मंत्री करायचे की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस घेतील. मला मंत्रिपद मिळाले किंवा नाही मिळाले, याची चिंता नाही. राज्याला सक्षम नेतृत्व मिळाले आहे आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असे ते म्हणाले. तसेच, जनतेची इच्छा आहे की मी मंत्री व्हावे. अमरावती जिल्ह्यात यापूर्वी बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे आणि प्रवीण पोटे मंत्री झाले आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि तो मला मान्य असेल, असेही राणा यांनी सांगितले.
राणा दाम्पत्याच्या सलग दाव्यांमुळे महायुतीतील पडद्यामागील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, संबंधित नेत्यांकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांमागील राजकीय संकेत काय आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.