District Court Of Buldhana. Google
विदर्भ

Buldhana Ravikant Tupkar : जामिनानंतर जाहीर केलेला ‘गनिमी कावा’ नेमका कोणता?

Farmer's Protest : रविकांत तुपकरांचे बेमुदत अन्नत्याग; पोलिसांचा ‘वॉच’ कायम

जयेश विनायकराव गावंडे

Court Grants Bail : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी केलेली अटक अयोग्य ठरवत न्यायालयानं त्यांनी शनिवारी (ता. 25) काही तासातच जामिनावर मुक्तता केली. पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येताच तुपकर यांनी आता पुढील आंदोलन ‘गनिमी कावा’ करीत करणार असल्याचं जाहीर केलय. इतकच नव्हे तर सोमठाणा येथे त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलय.

तुपकर यांची जामिनावर मुक्तता झाली असली तरी त्यांना ‘गनिमी कावा’ या शब्दाचा प्रयोग केल्यानं पोलिस यंत्रणेना ते मंत्रालयावर धडक देतात की काय याची भीती आहे. त्यामुळं त्यांच्यावर पोलिसांचा ‘वॉच’ कायम राहणार आहे. यासाठी पोलिस आता नियमाचा वापर करणार आहे. उपोषणस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. या नियमाचा फायदा आता पोलिस तुपकरांवर नजर ठेवण्यासाठी घेणार आहेत. (Ravikant Tupkar Gets Bail From Buldhana Court Now Started Indefinite Hunger Strike)

शनिवारी बुलढाणा शहर पोलिसांनी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तुपकर यांना नोटीस बजावली होती. मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. पोलिसांनी त्यांना हे आंदोलन रद्द करण्यासाठी नोटीस बजावली व काही तासानंतर ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक केल्याचं दाखविण्यात आलं. तुपकर यांच्यावरील या कारवाईचे पडसाद संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उमटले.

अटकेच्या कारवाईनंतर तुपकर समर्थक जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरले. त्यांनी टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा शहर पोलिस ठाण्यापुढंही कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. या आंदोलनादरम्यान नितीन राजपूत नावाच्या एका समर्थकानं पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं खळबळ उडाली. कायद्याप्रमाणे अटक केल्यानंतर काही तासातच बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकर यांना कोर्टापुढं हजर केलं. सरकारी वकिल आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचं नमूद करीत तुपकर यांना जामिन मंजूर केला. त्यामुळं पोलिसांनी त्यांना मुक्त केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टातून बाहेर पडताच तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग करीत असल्याची घोषणा केली. आता पुढील लढा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या ‘गनिमी कावा’ पद्धतीनं लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्यावर्षी आंदोलन करताना तुपकर भूमिगत होते. पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मात्र मान्य झाल्या. आता 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा ‘गनिमी कावा’ कोणता असेल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्नीनं मांडली पतीची बाजू

रविकांत तुपकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा कोर्टापुढं युक्तीवाद केला. अॅड. शर्वरी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयानं तुपकर यांची मुक्तता केली. त्यामुळं पतीच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी पत्नी यमराजाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण परत आणण्यात यशस्वी होते, ते तर कायद्यानं चाालणारं कोर्ट होतं, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT