Gram Panchayat Navargaon. Sarkarnama
विदर्भ

Gram Panchayat : नवरगावात एकाच दिवशी सरपंच, उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव

अभिजीत घोरमारे

Gram Panchayat : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या नवरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावर एकाच दिवशी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे आता सरपंच व उपसरपंचांना एकाचवेळी पायउतार व्हावे लागणार आहे. गोंदियाच्या इतिहासात एकाच दिवशी सरपंच आणि उपसरपंच पायउतार होण्याची ही पहिली घटना आहे. तिरोडा पंचायत समितीअंतर्गत नवरगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सन 2021 मध्ये होऊन सियानंद मूलचंद ठाकरे, सुखदेव गंगाराम चचाने, भाग्यश्री मुकेश पटले, रेखा हरलाल पटले, सरला सुखदास कोकुडे, प्रकाश काशीराम ठाकरे, भूमेश्वरी चंद्रशेखर कटरे हे सात सदस्य विजयी झालेत.

प्रकाश ठाकरे यांची सरपंचपदी तर भूमेश्वरी चंद्रशेखर कटरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. मात्र सियानंद ठाकरे, सुखदेव चचाने, भाग्यश्री पटले, रेखा पटले, सरला कोकुडे या पाच सदस्यांनी तिरोडा तहसील कार्यालयात सरपंच व उपसरपंच आम्हाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याने तक्रार केली. तक्रारीनंतर सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत तहसीलीदारांना पत्र दिले. सदस्यांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर तहसीलदारांनी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलाविली. तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी गजानन कोकुड्डे, तलाठी आनंद भूते, ग्रामपंचायत सचिव डी. एच. वाघमारे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभेत पाच सदस्यांनी अविश्वासाचे बाजूने, तर दोन सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने दोन विरुद्ध पाच मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. मतदानानंतर आता विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. यंदाचे वर्ष सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसाठी चांगले निघाले नाही, असे चित्र जिल्ह्यात आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीपासून सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अपात्र होण्याची रांग लागली आहे. अनेक ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचार उजागर होत आहेत. कारवाईचा फेराही वाढत चालला आहे. फौजदारी गुन्हा नोंद करून अटकसत्रही वाढत चालले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय युद्ध सुरू झाले आहे. अशातच कधी नव्हे ते एकाच दिवशी सरपंच आणि उपसरपंच पायउतार झाले आहेत. अलीकडच्या काही वर्षात सरपंच जनतेतून निवडला जात आहे, तेव्हापासून सरपंचाला अपात्र करण्यासाठी अनेक कारणेही दिली जात आहेत. परिणामी जिल्ह्यात सरपंच विरुद्ध सदस्य हा सामना अनेक ठिकाणी रंगत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामधूनच अपात्रतेच्या शस्त्राचा वापर सतत केला जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT