Water Supply in Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : गाव तहानेने व्याकुळलेले, अशात महिला सरपंचांने केले असे काही की...

संदीप रायपूरे

Gondpipri Tehsil : विजेचे बिल न भरल्याने महावितरण कंपनीने परिसरातील पाच पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे गावागावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तहानेन व्याकुळलेल्या जनतेच्या वेदंनावर फुंकर घालण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सिमेवरील गावातील एका महिला सरंपचाने जे काही केले ते ऐकून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. अपर्णा रेचनकर असे महिला सरपंचाचे नाव आहे. त्या सकमूर ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी उपविभागातील पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. वीज बिलाचे 6 लाख 13 हजार 807 रुपयांचे देयक न भरल्याने महावितरण कंपनीने ही कारवाई केली. या पाचही योजनेतून तालुक्यातील 30 गावांना पाणीपुरवठा केला जात होता.

महावितरणने वीज तोडल्याने आता पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ या गावांमधील नागरिकांवर ओढावली आहे. ज्या पाच योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, त्यात चेकबापूर-चेक नांदगाव योजनेचा समावेश आहे. या योजनेतून सात गावांना पाणी पुरवठा केला जातो. सकमूर, चेकबापूर, गुजरी, चेक नांदगाव, हेटी नांदगाव, कुडे नांदगाव, टोले नांदगाव या गावांचा समावेश आहे.

या सात गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाहीत. पाणी पुरवठा बंद असल्याने सात गावातील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीत ग्रामपंचायत सरपंच अपर्णा रेचनकर, त्यांचे पती अशोक रेचनकर यांनी सात गावांची तृष्णा भागविण्यासाठी धावून आले आहेत. वर्धा नदीच्या पात्रात योजनेची विहीर आहे. येथून योजनेत पाणी पुरवठा केला जातो. येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विहिरीच्या काही अंतरावर रेचनकर यांच्या मालकीची 10 एकर शेती आहे. शेतात मिरची, वांगे, टोमॅटोचे पीक उभे आहे. रोज शेतीला पाणी करावे लागते. मात्र सात गावाची तहान भागविण्यासाठी रेचनकर यांनी शेतीच्या सिंचनासाठी असलेल्या वीज पुरवठा, योजनेचा मोटारपम्पाकडे वळता केला आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी शेतीला मोठा फटका बसला आहे. शेत कोरडे पडले आहे. पीक करपत आहेत. गावासाठी शेतीची बळी देणाऱ्या रेचनकर दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एका महिला सरपंचाने गावातील नागरिकांची समस्या लक्षात घेत स्वत:च्या शेतातील पाणीपुरवठा गावाकडे वळता करीत ग्रामस्थांनी तृष्णा भागविण्याचे काम केले. त्यांच्या या औदार्याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. सरंपच म्हणजे गावाचे कारभारी. गावाच्या विकासाचा तो शिलेदार असतो. गावातील नागरिकांची सुखदुख: जाणणाऱ्या सरंपचात संवेदनशिलता असली की त्यातून अनेक मार्ग निघतात हेच सरपंच अपर्णा रेचनकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT