MLA Narendra Bhondekar On Uddhav Thackeray Group  Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Political News : मंत्रिपद पदरात पाडण्यासाठी भोंडेकरांंनी थेट ठाकरेंना घेतलं अंगावर...

अभिजीत घोरमारे

Bhandara - Gondia : एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी, या उद्देशाने महायुतीच्या आमदारांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यात 'किंगमेकर' असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन करण्याची मोठी धडपड आमदारांची सुरू आहे.

फडणवीसांवर सतत बोचरी टीका करणारे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चौफेर टीका करा आणि फडणवीसांचे मर्जीतील व्हा, असा प्रकार सतत पाहायला मिळत आहे. हा घाट राज्यातील युतीतील अनेक आमदार घालत असताना दिसून येत आहेत. या पंक्तीत आमदार नितेश राणेंनंतर आता भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरही सहभागी झाले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारने नुकत्याच बहुमतात पारित केलेल्या महिला आरक्षणाच्या ठरावावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भोंडेकर यांनी खासदार राऊत यांच्यावर जहरी टीका केली. राऊत हे मूर्ख असून, त्यांना गाढवावर बसवून फिरविले पाहिजे, असे बोल त्यांनी लगावले आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी नरेंद्र भोंडेकर(Narendra Bhondekar) असे विधान करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

केंद्र सरकारने नुकतेच महिलाच्या राजकीय आरक्षणाचे विधेयक संसदेत बहुमताने पारित केले आहे. त्यावरून सत्तापक्षाच्या या भूमिकेवर विरोधक विरोधाचा "सूर" आळवू लागले आहेत. अशात संजय राऊत यांनीही महिला आरक्षणाबाबत टीका केली होती. त्यावर आमदार नितेश राणे यांनी खासदार राऊत यांना 'शक्ती कपूर' म्हणून हिणवले होते. त्यावर शनिवारी भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेद्र भोंडेकर यांना विचारले असता, त्यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे.

आमदार भोंडेकर म्हणाले, महिला आरक्षण विधेयक संसदेत बहुमताने पारित झाले आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली होती, तर या विधेयकाविरोधात दोन मते पडली, तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 171 मते पडली. विरोधात एकही मत पडले नाही. असे असताना खासदार संजय राऊत यांनी टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊत(Sanjay Raut) हे मूर्ख असून, त्यांना गाढवावर बसवून फिरविले पाहिजे, असेही आमदार भोंडेकर म्हणाले.

या विधानानंतर राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एकेकाळी मृदुभाषी असणारे आमदार भोंडेकर अचानक अशा तीव्र प्रतिक्रिया का देऊ लागले आहेत. याचे कारणही जाणकार सांगू लागले आहेत. दोन टर्मचा आमदारकीचा टप्पा लागल्याने आमदार भोंडेकर यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मात्र, राजकीय घडामोडी व अजित पवार यांची अचानक सत्तेत झालेल्या एन्ट्रीने भोंडेकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले आहे.

त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागावी, या आशेवरील गटात नितेश राणेंप्रमाणे त्यांनी विरोधकांवर जबरी टीका करणे सुरू केले आहे. आपल्या विरोधकांबाबत जहरी विधानाने आपण किंगमेकर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या नजरेत येऊ असा संकल्पच भोंडेकर यांनी सोडल्याचे हा परिणाम असल्याचे जाणकार सांगताहेत. त्यामुळे भोंडेकरांचा हा प्रयत्न कितपत सफल होतो, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT