Shivsena District chief Sarkarnama
विदर्भ

Shiv Sena District Chief Arrested : कंपनी व नातेवाइकांच्या चर्चेत ढवळाढवळ करणे भोवले, शिवसेना जिल्हाप्रमुखाला अटक !

Karnataka Emta : जितेंद्र रामअवतार बरांज कर्नाटक एम्टा या कंपनीत फोरमन पदावर काम करीत होता.

संदीप रायपूरे

Chandrapur Shiv Sena District Chief News : कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला. कुटुंबीयांनी नातेवाइकांसह कंपनीशी मदतीसंदर्भात बोलणी सुरू केली. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तेथे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हाप्रमुखाने कंपनीच्या प्रतिनिधींना मारहाण केली. आता या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखासह (उद्धव ठाकरे गट) तिघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

जितेंद्र रामअवतार बरांज कर्नाटक एम्टा या कंपनीत फोरमन पदावर काम करीत होता. तो ठेकेदाराच्या कंपनीद्धारे कंत्राटी पद्धतीने कामावर होता. दरम्यान, स्थानिक मार्केट परिसरात काही कामानिमित्त तो गेला होता. या वेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबावर आभाळ कोसळलं. यादरम्यान मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.

शवविच्छेदन झाल्यावर शव रुग्णवाहिकेत ठेवले होते. दरम्यान, काल (ता. तीन) दुपारी कंपनीचे मुख्य अभियंता उदय लक्ष्मण नायक, अधिकारी नागेंद्र भारती, कंपनीचे पॅनेलवरील लीगल अधिवक्ता श्रीनिवास व मृत कर्मचाऱ्याची पत्नी, नातेवाईक व गावकरी यांच्यात मोबदल्याकरिता वाटाघाटी सुरू होत्या. मृताच्या नातेवाइकांनी कंपनीकडे २५ लाखांची मागणी केली. मात्र, कंपनीने पाच लाख रुपये मोबदला मंजूर केला.

त्याचवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, मनीष जेठानी, महेश जीवतोडे, अमित निब्रड यांनी सदर प्रकरणात नियमानुसार कुटुंबीयांना मदत मिळायला हवी, अशी भूमिका घेतली. यादरम्यान कंपनीचे प्रतिनिधी उदय लक्ष्मण नायक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांशी बाचाबाची करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हा तणाव वाढण्याची चिन्हे दिसताच भद्रावती पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने सध्या मृतकाच्या नातेवाइकांना मंजूर मोबदल्यांपैकी पन्नास हजार रुपये दिले. या वेळी मारहाण झाल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘पैसे देऊ आणि मार पण खाऊ का?’, अशी भूमिका घेतल्याने गोंधळलेली अवस्था निर्माण झाली.

आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलाविले नाही. त्यांनीच स्वतःहून येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) मुकेश जीवतोडे, मनीष जेठानी, महेश जीवतोडे, अमित निब्रड यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. आता प्रकरण वाढल्यानंतर कंपनीकडून मदतीचा दिलेला शब्द पाळला जाईल का, ही चिंता कुटुंबीयांना लागली आहे.

या प्रकरणात राजकीय पदाधिका-यांनी विनाकारण हस्तक्षेप केल्याने आम्हाला त्रास होत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे. मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळावी, यासाठी आम्ही कंपनीच्या अधिका-यांकडे मागणी केली. मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. यामुळे उपस्थितांमध्ये संताप पसरला. त्या कामगाराला नियमानुसार आर्थिक मदत मिळायला पाहिजे. यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT