Shiv Sena Sanjay Gaikwad. Sarkarnama
विदर्भ

Shiv Sena : शिवजयंती मिरवणुकीत शिंदेंच्या आमदाराने बुलढाण्यात युवकांना तुडविले

Fahim Deshmukh

Shiv Sena : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि वाद हे समीकरणच झाले आहे. वादग्रस्त विधान, वाघाची शिकार, जमीन बळकविल्याचा आरोप अशातून जात असलेले संजय गायकवाड आता नव्या वादात अडकले आहेत. शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना लाथाबुक्क्यांनी तुडवत आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या काठीने चामडी लोळेपर्यंत मारहाण केली आहे. दैव बलवत्तर म्हणून मारहाण सहन करणारे हे युवक सुखरूप बचावले. गायकवाड यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यानंतर अचानकपणे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील खरा छावा जागा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणारे आणि एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या गटावर राज्यभरातून होणारी टीका, आरोप-प्रत्यारोप यावर वेगळ्याच शब्दांमध्ये उत्तर देणारे राज्यातील एकमेव आमदार म्हणून संजय गायकवाड यांचे नाव समोर आले. त्यांनी खासदार संजय राऊत आणि विविध नेत्यांना शिवीगाळ करीत धमक्याही दिल्या. मध्यंतरीच्या काळात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेता महाले यांच्यावरही टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गायकवाड यांच्या टीका-टिप्पणीनंतर दोनदा जिल्ह्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. शिवजयंतीच्या मिरवणुकीत गळ्यात घातलेल्या हारात असलेली वस्तू आपण केलेल्या शिकारीतील वाघाचा दात असल्याचे वक्तव्य गायकवाड यांनी केले. त्यानंतर वन विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर नागपूरच्या एका महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये जमीन बळकावल्याप्रकरणी आणि जीव मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाण्यातील न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये युवकांना लाथाबुक्क्यांनी तुडवत पोलिसांच्या काठीने चामडी लोळेपर्यंत मारहाण केल्याचा गायवाड यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

पोलिसांच्या काठीने युवकांना मारहाण करीत असतानाच्या व्हिडिओत संजय गायकवाड हे स्पष्टपणे दिसतात. बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या या व्हिडिओमध्ये शिवजयंतीची मिरवणूक दिसते. या मिरवणुकीत वादानंतर आमदार गायकवाड युवकांना सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी तुडवताना दिसतात. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांच्या हातातील काठी हिसकावत युवकांना अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करताना दिसतात. गायकवाड यांना काही कार्यकर्ते अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोणालाही न जुमानता आमदार संजय गाकवाड अत्यंत हिंसक पद्धतीने जमिनीवर लोळणाऱ्या युवकाला पडेल त्या कडावर मारहाण करतात. युवक वेदनेने विव्हळत असतो. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ गोंधळ उडाल्याचे दिसते.

असाच असतो का लोकप्रतिनिधी?

एखादी घडना घडल्यानंतर लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीने कायदा हाती घेणे योग्य वाटते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मिरवणुकीत मारहाण करणारे गायकवाडांचे विरोधक असो अथवा समर्थक त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मिरवणुकीत युवकांचा वाद झाला, त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले होते. त्यामुळे वास्तविकतेत आमदार गायकवाड यांना इतके हिंसक होण्याची काहीच गरज दिसत नव्हती. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त नक्कीच केला असता. परंतु आमदार गायकवाड यांनी पोलिसांनाही लोटून दिले. त्याच्या हातातील काठी हिसकावली आणि बेदम मारहाण केली.

एका लोकप्रतिनिधीने सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने युवकांना अमानुष मारहाण करण्याचा प्रकार अत्यंत अशोभनीय असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील नेते म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. अपघातामध्ये दुखापत झालेल्या जखमींना शिंदे यांनी स्वत: दवाखान्यात नेल्याचे उदाहरण अगदी अलीकडच्या काळातील आहे. त्याच शिंदे यांचे शिलेदार इतके अमानुष कसे काय असू शकतात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आक्रमकता ही चांगली असते, परंतु संजय गायकवाड यांची आक्रमकता, भाषाशैली ही एकनाथ शिंदे यांच्या विचारांना पटणारी आहे काय? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. अशा मारहाणीत देव न करो त्या युवकाच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर जबाबदारी कोणी घेतली असती पोलिसांनी, संजय गायकवाडांनी, की स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा जाब सूज्ञ मतदार विचारत आहेत. यासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT