Sanjay Gaikwad Sanjay Gaikwad
विदर्भ

Shiv Sena : मुलीस छेडणाऱ्याला चोप दिला, बलात्कार होण्याची वाट पाहायची असती का? गायकवाडांचा संताप

Sanjay Gaikwad होय! बदमाशांच्या टोळक्यातील मुलाला धडा शिकवला. कोणताही पश्चाताप नाही. महिलांच्या अब्रूवर चालून येणाऱ्यांचे हात शिवरायांनीही छाटल्याचा दिला दाखला

Fahim Deshmukh

Shiv Sena : ‘माझ्याकडे एखादी मुलगी येते. ती संकटात आहे आणि ती मदत मागत आहे, मग मी पोलिसांची मदत पोहोचेपर्यंत मुलीवर बलात्कार होण्याची वाट पाहायची असती का?’ असा सवाल करीत ‘होय मी त्या टोळक्यातील मुलांना चोप दिला. मुलींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवला. शिवरांनीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे हात छाटले. मी मारहाण केल्याची कोणतीही खंत मला नाही. पश्चताप नाही. महिलांच्या अब्रूवर संकट असताना पोलिसांची वाट बघत बसणाऱ्यांपैकी मी नाही’, अशी ठाम कबुली बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. शनिवारी (ता. दोन) बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बुलढाणा शहरात 19 फेब्रुवारीला निघालेल्या शिवजयंती मिरवणुकीत एका तरुणाला आमदार संजय गायकवाड तसेच त्यांचे बॉडीगार्ड यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी 2 मार्चला आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी ते म्हणाले की, बुलढाणा शहरात गांजा, बॉण्ड इतर नशा करणारी एक टोळी सक्रिय आहे. ही टोळी कोणत्याही कार्यक्रमात घुसून लोकांना चाकू मारतात. शिवजयंतीच्या दिवशीही दोन तरुण चाकू घेऊन मिरवणुकीत आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर एका मुलीने आपल्याला येऊन मदत मागितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलीने सांगिल्यानंतर आपला बॉडीगार्ड तेथे गेला. टोळक्याने त्याला खाली पाडून मारहाण केली. त्यामुळे आपण काठी हिसकावली व हल्ला करणाऱ्याला बेदम चोप दिला. मिरवणुकीत येऊन कोणी आमच्या माता-भगिनींना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशांना चोप दिला तर चुकीचे केले नाही. त्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. शिवजयंती मिरवणुकीत 40 हजार लोकांचा जमाव होता. पोलिसांची संख्या कमी होती. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी चोख काम केले असते तर चोऱ्या झाल्याच नसत्या, गुन्हेगारी वाढलीच नसती, बलात्कार झालेच नसते, आरोपी मोकळे फिरलेच नसते. तसेही एखादी महिला संकटात असताना पोलिसांची वाट पाहात बसणाऱ्यांपैकी आपण नाही, असे ठामपणे त्यांनी स्पष्ट केले.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे गेल्या आठवडाभरात विविध घटनांमुळे चांगले चर्चेत आले आहेत. एकापाठोपाठ एक गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवजयंतीच्या घटनेबाबात मात्र त्यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुलढाणा शहरातील शिवजयंती मिरवणुकीत एका युवकाला काठीने बेदम मारहाण करताना आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर विरोधकांनी आमदार गायकवाड आणि त्यांच्या माध्यमाने राज्य सरकारवर निशाणा साधला होता. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती.

आपण मारहाण करण्यापूर्वी पोलिसांना याबाबत माहिती का दिली नाही, असे पत्रकारांनी विचारले असता, आमदार गायकवाड म्हणाले की, ‘त्या मुलीचा बलात्कार होण्याची वाट पाहायची असती का?असा सवाल करीत होय मी मारले आणि यापुढेही अशा लोकांना मी धडा शिकवणारच आहे’, असे त्यांनी सांगितले. बुलढाण्यात अवैध व्यवसाय, गांजा विक्री, बोर्ड विक्री यासह अनेक अवैध धंदे सुरू आहेत. पोलिस त्या बाबतीतही कमी पडत आहेत. पोलिसांच्या भरोशावर बसलो असतो तर खूप वेळ झाला असता, असे ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT