MLC Bhavana Gawali Sarkarnama
विदर्भ

Maharashtra MLC Elections : भावना गवळी लाल दिवा घेऊन येणार आणि सर्वांचा हिशेब चुकता करणार !

Rajesh Charpe

Nagpur News : माजी खासदार भावना गवळी केव्हा मंत्री होऊन लालदिव्याची गाडी घेऊन येतात याकडे वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून त्या पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याने पक्षांतर्गत विरोधकांची धाकधूक वाढली आहे. पाच वेळा लोकसभेत अपराजित राहिल्यानंतरही तिकीट कापणाऱ्यांना आता धडा शिकवा अशी जोरदार मागणी आतापासूनच होऊ लागली आहे.

लोकसभेच्या निवडणुकी भावना गवळी सलग पाच वेळा निवडूण आल्या होत्या.त्या पुन्हा निवडूण आल्या असत्या असा दावा त्यांचे समर्थक आजही करतात. त्या विजयी झाल्या असत्या तर केंद्रात मंत्रीपद निश्चित होते. हीच बाब अनेकांना खटकत होती. त्यामुळे पक्षातील काही बड्या नेत्यांनीच त्यांचा गेम केल्याचा आरोप आहे. एकाच जिल्ह्यात असल्याने आमदार संजय राठोड यांचासुद्धा त्यांच्या नावाला छुपा विरोध होता. गवळी यांच्या वर्चस्वामुळे भाजप आणि काँग्रेसलाही येथे जास्त हातपाय पसरवता येत नव्हते.

मध्यंतरी गवळी यांच्या कारखान्यावर धाडी पडल्या होत्या. ईडीनेही कारवाई केली होती. त्यामुळे भाजपचा सुरुवातीपासून त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनाही एक पाऊल मागे घ्यावे लागले. भावना गवळी यांना बसवून महायुतीने हिंगोलीतून राजश्री पाटील यांना आयात केले. यामुळे एका जागा महायुतीला गमवावी लागली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गवळी यांना पुनर्वसनाचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री शब्दांचे पक्के असल्याने त्या मंत्रीसुद्धा होतील असे बोलले जात आहे.

यवतमाळ-वाशीम जिल्ह्यात भावना गवळी यांच्यामुळेच शिवसेना (ShivSena) फोफवली होती. त्यांना उमेदवारी नाकारताच शिवसेनेला जबर फटका बसला. सक्षम नसतानाही महाविकास आघाडीचे संजय देशमुख निवडूण आले. हे बघून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेसुद्धा सक्रिय झाले आहेत. त्यांनीही आता दोन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे.

यात संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघाचाही समावेश आहे.त्या मंत्री झाल्यास पडद्यामागून आणि उघडपणे गेम करणाऱ्या सर्वांचा हिशेब त्या चुकता करीत असे दावे केले जात आहे. प्रंचड आणि वैयक्तिक जनसंपर्क ही भावना गवळी यांची ताकद आहे. गावागावात शिवसेनेच्या शाखा आणि त्यांचे कार्यालय आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT