Shiv Sena Wins against Sarpanch Team Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : सरपंच संघाच्या कडव्या झुंजीनंतर चुरशीच्या सामन्यात शिवसेनेचा विजय!

Amar Ghatare

Sarpanch Titans Vs Shiv Sena Riders : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : सरपंच संघानं धावांचा उभा केलेला डोंगर आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना भेदताना शिवसेना(शिंदे गट) रायडर्स संघाला विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली.

अखेरच्या क्षणापर्यंत सरपंच संघानं विजयासाठी कडवी झुंज दिली. संघाच्या प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान देत विजय खेचण्याचा कसोशिनं प्रयत्न केला. मात्र अत्यंत रोमहर्षक सामन्यात अखेरच्या क्षणी शिवसनेना संघानं विजय मिळविला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा पाचवा सामना सरपंच टायटन्स आणि शिवसेना(Shivsena) रायडर्स यांच्यात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरपंच टीमनं फलंदाजी सुरू केली. तौसिफ खान आणि राहुल मोहजे सलामीला आलेत. पहिलं षटक पी. बाजवा यांनी टाकलं. कोणताही गडी न गमावता सरपंचांनी 11 धावा काढल्या. परवेज यांनी दुसऱ्या षटकात कमी धावा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना क्षेत्ररक्षकांनी साथ देण्याचा प्रयत्न केला परंतु काही चौकार गेलेच. दुसऱ्या षटकापर्यंत सरपंचांनी 22 धावसंख्या गाठली. पुन्हा बाजवा यांनी तिसरं षटक टाकताना दोन ‘डॉट बॉल’ टाकले आणि अनिल यांना बाद केलं. परंतु ‘रिव्ह्यू’मध्ये तिसऱ्या पंचांनी त्यांना नाबाद ठरविले.

अमन खालसा यांच्या तिसऱ्या षटकात तौसिफ खान आणि अनिल यांनी 10 धावा काढल्या. त्यामुळं सरपंच टीम चौथं षटक संपेपर्यंत 46 धावांवर होती आणि एकही गडी तोपर्यंत बाद झाला नव्हता. त्यानंतर तुषार दलाल यांनी शेवटचं पाचवं षटक टाकलं. त्यावेळी धावबादसाठी अपील झाली. परंतु स्टम्पला चेंडू नव्हे हात लागल्याचा निर्णय पंचांनी दिला. पहिला डाव संपेपर्यंत सरपंच टीमने कोणताही गडी न गमावता 62 धावा काढल्या.

शिवसेनेने पोलार्ड बाजवा आणि प्रवेश आसुदानी यांना सलामीला पाठवलं. परंतु संघ शून्यावर असतानाच आसुदानी बाद झाले. त्यानंतर लड्डुपाजी मैदानावर आले. पहिलं षटक संपताच 1 बाद 4 धावा अशी शिवसेनेची धावसंख्या होती. अजय यांनी दुसऱ्या षटकात टाकलेले चेंडू फलंदाजांनी सीमापार टोलविले.

तिसरं षटक राहुल मोहजे यांनी टाकलं. तेव्हा सेनेचा धावफलक 1 गडी बाद 33 असे झाले होते. 12 चेंडूत 30 धावांची गरज विजयासाठी शिवसेनेला होती. तौसिफ खान यांनी चौथं षटक टाकताना शिवसेनेच्या फलंदाजांना रोखण्याचा जोरदार प्रयत्न केला.

7 चेंडूत 17 धावा त्यावेळी सेनेला विजयासाठी हव्या होत्या. त्यावेळी लड्डुपाजी यांनी षटकार ठोकला. अखेरचं षटक अनिल यांनी टाकलं. 5 चेंडूंवर 5 धावा हव्या होत्या. त्यावेळी लड्डुपाजी यांनी एक एक धाव चोरली. अखेरच्या क्षेणी 3 चेंडूत 3 धावा गरजेच्या होत्या. त्यावेळी लड्डु पाजी धावबाद झाले. त्यानंतर 2 चेंडूत 3 धाव्या हव्या असताना अमन खालसा यांनी जोखीम घेतली आणि धावा काढल्या. पुढे 1 चेंडूत 1 धाव हवी होती. त्यावेळी पोलार्ड बाजवा यांनी चौकार मारत विजय शिवसेनेच्या खात्यात खेचून आणला.

सामनावीराचा पुरस्कार भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते पोलार्ड बाजवा यांना प्रदान करण्यात आला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT