Nana Patole-Uddhav Thackeray
Nana Patole-Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Shivsena VS Congress : रामटेकवरुन आघाडीत बिनसलं? ठाकरे गटाने ठोकला दावा तर काँग्रेसही आग्रही

Rajesh Charpe

Nagpur News, 11 June: रामटेक लोकसभा जिंकताच रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा ठोकला आहे. शिवसैनिकांनी मंथन बैठक घेऊन विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांना विजयी करण्याचा संकल्पसुद्धा सोडला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या जागेवर माजी अर्थराज्यमंत्री तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आधीच दावा केला आहे. हे बघता जागा वाटपाच्या वेळी महाविकास आघाडीत मोठे मतभेद उफाळण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेमुळे रामटेक कुणाचे यावरू नवा वाद सुरू झाला आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आशिष जयस्वाल यांनी तीन वेळा शिवसेनेला तो जिंकून दिला होता.

2014 साली युती आणि आघाडी तुटल्यानंतर भाजपच्या मल्लिकार्जून रेड्डी यांनी जयस्वालांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र पाच वर्षांतच त्यांनी अपक्ष लढून कमबॅक केले. ते सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत. शिवसेना (Shivsena) जिंकत आली असल्याने उबाठाने यावर आपला दावा सांगितला आहे. दुसरीकडे माजी अर्थराज्यमंत्री तसेच विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, काँग्रेसचे नेते मधुकरराव किंमतकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

काँग्रेस (Congress) विरुद्ध शिवसेना असाच आजवर येथे सामना रंगला आहे. त्यामुळे काँग्रेसही मतदारसंघावर आपला हक्क सांगत आहे. रामटेकमधून लाढण्यास माजी अर्थराज्यमंत्री तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. मागील दहा वर्षांपासून ते रामटेकवरच फोकस करीत आहेत. स्थानिकांच्या विरोधामुळे मागील निवडणुकीत त्यांनी माघार घेतली होती. काँग्रेसने गज्जू यादव यांना उमेदवारी देऊन पराभव ओढावून घेतला होता.

यादव आता भाजपमध्ये गेले आहेत. रामटेक विधानसभा काँग्रेससाठी पोषक मानली जाते. जागा वाटपाची कुठलीही चर्चा आणि वाटाघाटी झाली नसतानाही उबाठाने आधीच दावा ठोकल्याने येथे मतभेद उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संघटक म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर विशाल बरबटे यांनी नागपुरातून आपला मुक्काम रामटेकमध्ये हलवला आहे. सुमारे दोन वर्षांपासून ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

रामटेक लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला आहे. यात काँग्रेस आणि उबाठा दोघेही वाटेकरी आहेत. त्यामुळे ही जागा सोडताना काँग्रेस आणि उबाठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंथन बैठक घेतली.

यात लोकसभेप्रमाणे रामटेक विधानसभेची निवडणूकसुद्धा ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. विशाल बरबटे यांना आमदार करण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देशसुद्धा या बैठकीत देण्यात आले आहेत. मात्र आता ही जागा कोणाला मिळणार शिवसेना ठाकरे गट की काँग्रेस याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT