यवतमाळ: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. मात्र, यवतमाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत (Yavatmal Nagarpanchayat Election) मात्र कॉंग्रेसला (Congress) दूर ठेवत भाजप (BJP) व शिवसेनेने (Shivsena) युती करत महागाव, मारेगावात झेंडा फडकावला आहे.
काँग्रेसकडून ज्या ठिकाणी दगाफटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या नगरपंचायतीत गनिमी काव्याचा वापर करीत शिवसेनेने सत्ता मिळविली. तर भाजपला केवळ सोबत घेतले. त्यांना कोणत्याही प्रकारचे पद दिले नाही, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
महागाव नगरपंचातीच्या निवडणूकीत जनतेने दिलेला कौल संमिश्र स्वरूपाचा होता. कुठलेतरी दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे कठीण होते. महाविकास आघाडीत मतभेद असल्याने शिवसेनेने आमच्याकडे प्रस्ताव दिला. त्यानंतर शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मिळून महागाव नगरविकास आघाडी स्थापन केली. येणाऱ्या काळात या आघाडीच्या नेतृत्त्वात महागाव नगरपंचायतीचा कारभार चालणार आहे. शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष एका विचारधारेचे आहेत. राज्यात अनेक वर्षे त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. राज्यात काहीही सुरु असलं तरी महागावात शिवसेना-भाजपने एकत्र यावे हीच महागावकरांची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही एकत्र येऊन याठिकाणी सत्ता स्थापन केली, असंही यावेळी नितीन भुतडा यांनी सांगितलं.
यवतमाळमध्ये नगरपंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीला धक्का देत भाजप सोबत युती केली आहे. जिल्ह्यातील बाभूळगाव, मारेगाव , महागाव, झरी या नगरपंचायतीवर (Nagarpanchayat Elections) शिवसेनेने (Shivsena) भगवा फडकवला. तर राळेगाव आणि कळंब नगरपंचायतीवर काँग्रेसने (Congress) विजय मिळवला. बाभूळगावात शिवसेनेच्या संगीता मालखुरे, मारेगावात शिवसेनेचे डॉ. मनीष मास्की, महागावमध्ये करुणा नारायण शिरभिरे आणि झरी नगर पंचायतीत ज्योती संजय बिचकूलवार यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर राळेगावमधून काँग्रेसचे रवींद्र शेराम आणि कळंबमध्ये अफरोझ बेगम फारूक सिद्दीकी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली.
निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मारेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी असताना काँग्रेसवर मात करत शिवसेनेने मारेगाव नगरपंचायतीवरही विजयाचा भगवा फडकवला. मारेगाव नगरपंचायतीत शिवसेनेचे डॉ. मनिष मस्की विजयी झाले. त्यांनी 8 विरुद्ध 7 मतांनी शिवसेनेनी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांचा पराभव केला.
विशेष म्हणजे शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत हा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानास अनुपस्थित राहून सेनेला मदत केले आहे. तर झरी नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने जंगोम दलासोबत युती करत कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. झरी नगरपंचायत. मारेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकल्याने माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मुसद्दी राजकारणाचा हा विजय मानला जात आहे. तर दोन्ही नगरपंचायतील हाती आलेली सत्ता गेल्याने काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दुरु ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. यवतमाळमध्येआज झालेल्या 6 नगरपंचायतीच्या निवडणुकीत 4 जागांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. तर महागाव आणि मारेगावमध्ये शिवसेना-भाजपाने युती केली. महागावमध्ये महाविकास आघाडी डावलून शिवसेनेने भाजपशी घरोबा करत नगरपंचायतीत संख्याबळ जुळवून आणण्यात यश आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.