Prataprao Jadhav in Buldhana. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : बुलढाण्याच्या जागेवरून शिवसेना-भाजपात ओढाताण कायम

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘मिशन-48’ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. राज्यातील शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. बुलढाण्याच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. असे असतानाच भाजपाचा डोळा असलेल्या या मतदारसंघात शिवसंकल्प यात्रा येत असल्याने शिवसेनेला बुलढाण्याची जागा सोडायची नाही, असे दिसते.

भाजपाकडून या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड करीत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. आता लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे.

‘मिशन-48’ ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प हाती घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेणार आहे. त्यातून शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. बंडखोरीनंतर शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 13 खासदार आलेत. त्यामुळे ही यात्रा आपल्या मतदारसंघात यावी, असे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक खासदारांची इच्छा आहे. त्यानुसार ही यात्रा 13 पैकी 11 मतदारसंघांत जाणार आहे. यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचादेखील समावेश आहे.

याच मतदारसंघावर भाजपाकडून दावा केला जात आहे. हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे देण्यात आली आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे कसा खेचून घेता येईल, त्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडूनही हा मतदारसंघ भाजपाला मिळू नये, यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुलढाणा मतदारसंघासाठी महायुतीतील दोन्ही पक्षांकडून चांगलीच ओढाताण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकसभा मिशनसाठी असलेली शिवसंकल्प यात्रा ही या मतदारसंघात येणार आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला द्यायची नसल्याचे संकेत शिवसेनेकडून देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलढाण्याच्या जागेपेक्षा यवतमाळ-वाशीमची जागा शिवसेनेकडून भाजपाला देण्याची शक्यता अधिक वाढली आहे. शिवसंकल्प यात्रेतून यवतमाळ-वाशीम या मतदारसंघाला वगळण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांनी पाचवेळा बुलढाणा दौरा करीत हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांनी जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात भेट दिली आहे. ‘मिशन-45’अंतर्गत भाजपाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून बुलढाणा या मतदारसंघाची जागा चौथ्या क्रमांकावर दाखवली आहे. त्यामुळे भाजपाने या मतदारसंघावर दावा केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे सहकारी खासदार प्रतापराव जाधव यांची धाकधूक सध्या त्यामुळे वाढली आहे. खासदार जाधव यांनी भूपेंद्र यादव यांच्या दौऱ्याला टाळल्याचे बोलले जाते. शिवसेना किंवा भाजपाने बुलढाणा लोकसभेच्या जागेबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र प्रतापराव जाधव यांचा पत्ता कट करण्याला शिवसेना शिंदे गटातूनही विरोध आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंकल्प यात्रा आणि भाजपाकडून केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांचे दौरे यामुळे बुलढाण्याच्या जागेवरून या दोन्ही पक्षात ओढाताण सुरू असल्याचे दिसत आहे. बुलढाण्याच्या जागेवर कोण बाजी मारतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. भाजपा शिवसेनेच्या ओढताणीत या दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र हे चांगलेच संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT