Shyam Manav chandrashekhar bawankule devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

Shyam Manav : चंद्रशेखर बावनकुळेंना श्याम मानव यांचे प्रत्युत्तर, 'राजकीय संस्कृती...'

Rajesh Charpe

Shyam Manav News : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुखांना फसवल्याचा आरोप केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक श्याम मानव भाजपच्या टार्गेटवर आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा त्यांच्यावर टीका केली. बावनकुळे यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांची राजकीय संस्कृती दिसून येते, असा टोला श्याम मनाव यांनी लगावला तसेच गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला.

श्याम मानव यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुखांवर खोटे प्रतिज्ञापत्र भरून देण्यासाठी भाजप, देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला होता असा आरोप केला.

त्यानंतर देशमुखांनी श्याम मानव खरे बोलत असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव कसा टाकला, कुठल्या नेत्याच्या विरोधात प्रतिज्ञानपत्र भरून देण्यास सांगितले याची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे.

हे आरोप खोडून काढताना देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या नावाचा उल्लेख करून महायुतीवर सोडलेली माणसे असा आरोप केला होता. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंडिया आघाडीने राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला असल्याचे सांगितले. त्यात 68 लोकांचा समावेश आहे असे सांगून श्याम मानवर यांच्याकडेसुद्धा अंगुलीनिर्देश केला.

या सर्व घडामोंडीवर बोलताना श्याम मानव म्हणाले, मी बावनकुळे यांचा आभारी आहे. त्यांचे आकलन ग्रेट आहे. यातून त्यांची राजकीय संस्कृती दिसून येते. महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आणि समतेचा आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवला. पुरोगामी कार्यकर्त्यांबाबत ते अशा पद्धतीने बोलत असतील तर बावनकुळे व त्यांच्या पक्षाची संस्कृती दिसून येते.

भाजपचे लोक हे धीरेंद्र महाराज यांना घेऊन फिरत होते. ते छूत अछूत भेदभाव पाळतात. संभाजी भिडे यांचे म्हणणे महात्मा गांधी मुस्लिम माणसाची उपज असे आहे. तेच संभाजी भिडे आमचे गुरूजी आहेत असे देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगतात. ही भाजपची संस्कृती आहे आणि ते तसेच वागणार असल्याचे श्याम मानव म्हणाले.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT